केज: केज तालुक्यातील सारूळ फाटा ते सांगवी फाटा दरम्यान चालत्या ट्रकची ताडपत्री फाडून अज्ञात चोरट्यांनी ७१ हजार ५०० रुपये किमतीची चहापत्ती चोरून नेल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेबाबत शेख मुसा बाबा शेख (वय ५६, रा. देवगाव कुसळी, ता. बदनापूर, जि. जालना) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, ते महिंद्रा कंपनीच्या ट्रकमध्ये विक्रम कंपनीची चहापत्ती भरून जालन्याहून लातूरकडे जात होते. पहाटेच्या सुमारास सारूळ फाटा ते सांगवी फाटा दरम्यान त्यांच्या चालत्या ट्रकचा दुचाकीवरून पाठलाग करून अज्ञात चोरट्यांनी ट्रकची मागील ताडपत्री फाडली. त्यानंतर चोरट्यांनी ट्रकमधील ६ हजार ५०० रुपये किमतीची एक बॅग याप्रमाणे एकूण ११ चहापत्तीच्या बॅगांची चोरी केली. लातूर येथे गाडी रिकामी करताना हा चोरीचा प्रकार फिर्यादीच्या लक्षात आला.

याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार बाबासाहेब रंगनाथ बांगर हे करीत आहेत. पोलीस आता या मार्गावरील धागेदोरे तपासून अज्ञात चोरट्यांचा कसून शोध घेत आहेत.