केज :- "तू लई माजलास." असे म्हणून केज तालुक्यात एका लोहार समाजातील व्यक्तीला चौघांनी लोखंडी पाईप, काठी आणि लाथा बुक्क्यानी मारहाण केली असून मारहाणीत त्या इसमाचा हात फ्रॅक्चर झाला आहे.
दि. २३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ६:०० वा. च्या दरम्यान चंदन सावरगाव तालुका केज येथील दत्तात्रय गौतम पोपळघट घरी असताना ज्ञानेश्वर गणपत इंगळे हा घरी आला आणि त्याने दत्तात्रय पोपळघट यास शिवीगाळ करून चापट बुक्क्यांनी मारहाण केली. त्यावेळी नातेवाईकांनी त्यांच्या भांडणाची सोडवा सोडव केली. त्या नंतर काही वेळाने दत्तात्रय पोपळघट व त्यांचे दोन भाऊ असे तिघेजण कामा निमित्त गावातील बस स्टँडवर गेले असता ज्ञानेश्वर गणपत इंगळे, जिवन आप्पाराव तपसे, मारोती जिवन तपसे आणि अशोक मेटे त्यांच्या जवळ आले. अशोक मेटे हा दत्तात्रय पोपळघट याला म्हणाला की, "तु लई माजलास." असे म्हणुन त्याने अगोदर झालेल्या भांडणाची कुरापत काढुन शिवीगाळ केली. तर ज्ञानेश्वर गणपत इंगळे, जिवन तपसे व मारोती तपसे यानी दत्तात्रय पोपळघाट आणि त्यांच्या दोन्ही भावास चापटाने व लाथाबुक्यानी मारहान केली. ज्ञानेश्वर गणपत इंगळे यांनी त्याचे हातातील लोखंडी पाईपने उजव्या हातावर मारून मला गंभीर जखमी केले. अशोक मेटे याने लाकडी काठी हातात घेवुन त्या तिघा भावांना मारहाण केली. या मारहाणीत दत्तात्रय पोपळघट यांच्या हाताला जखम होवून फ्रॅक्चर झाले आहे.
त्यांच्यावर युसुफवडगाव येथील सरकारी दवाखान्यात प्रथमोपचार केल्या नंतर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय येथे उपचार करण्यात आले.
दत्तात्रय पोपळघट यांच्या तक्रारी वरून ज्ञानेश्वर गणपत इंगळे जिवन आप्पाराव तपसे, मारोती जिवन तपसे आणि अशोक मेटे या चौघा विरुद्ध युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात गु. र. नं. २९१/२०२६ भा. न्या. सं. ११५(२), ११८(१), ११८(२), ३५२(२), ३५२, ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप मांजरमे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉस्टेबल केशव खाडे हे तपास करीत आहेत.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!