केज: प्लॉट खरेदी करण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये घेऊन येण्याच्या मागणीवरून एका २९ वर्षीय विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करत तिला उपाशीपोटी घरातून हाकलून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. माजलगाव येथे घडलेल्या या गंभीर प्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात पती, सासू आणि नणंद अशा तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उपाशी ठेवून केली मारहाण
केज येथील मुमताज फेरोज शेख (वय २९) यांचा विवाह माजलगाव येथील फेरोज सिकंदर शेख याच्याशी झाला होता. लग्नानंतर काही दिवसांतच पती फेरोज याने प्लॉट खरेदी करण्यासाठी आई-वडिलांकडून दोन लाख रुपये आणण्याचा तगादा लावला. या कारणावरून पतीसह सासू बानू सिकंदर शेख आणि नणंद परवीन सिकंदर शेख यांनी संगनमत करून विवाहितेला सातत्याने शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली. माहेरहून पैसे आणले नाही तर घरात राहायचे नाही, अशी धमकी देत तिला उपाशीपोटी ठेवण्यात आले आणि अखेर घरातून हाकलून देण्यात आले.
पोलिसांत धाव
हा जाच आणि छळ १७ फेब्रुवारी ते २० मे या कालावधीत सातत्याने सुरू होता. अखेर या अत्याचाराला कंटाळून मुमताज शेख यांनी केज पोलीस ठाण्यात धाव घेत घडलेल्या प्रकाराची तक्रार नोंदवली. त्यांच्या तक्रारीवरून पती फेरोज शेख, सासू बानू शेख आणि नणंद परवीन शेख यांच्याविरुद्ध कौटुंबिक छळवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस जमादार निर्मला जाधव या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!