वडवणी: उसने घेतलेले ३५ हजार रुपये परत करूनही जास्तीच्या पैशांसाठी होणाऱ्या सततच्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना वडवणी तालुक्यातील कवडगाव येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून दोघांविरुद्ध वडवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, माऊली विनोद काळे याने अमोल उजगरे याच्याकडून ३५ हजार रुपये उसने घेतले होते. हे पैसे परत केल्यानंतरही अमोल उजगरे आणि प्रेम उजगरे (दोघे रा. वडवणी) हे माऊलीकडे आणखी पैशांची मागणी करून त्याला सतत त्रास देत होते. तसेच, तीन दिवसांपूर्वी त्यांनी माऊलीची दुचाकीही बळजबरीने नेली होती. ११ ऑक्टोबरला दुपारी अमोल उजगरे याने शेतात येून माऊलीला शिवीगाळ करत मारहाण केली. या सर्व जाचाला कंटाळून माऊलीने १२ ऑक्टोबर रोजी सकाळी स्वतःच्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये गळफास घेऊन जीवन संपवले. मृत तरुणाचा भाऊ आनंद काळे याच्या फिर्यादीवरून वडवणी पोलिसांनी अमोल उजगरे आणि प्रेम उजगरे यांच्यावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.