वडवणी तालुक्यातील कवडगाव येथे जुन्या भांडणाचा राग मनात धरून एका शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. उत्तरेश्वर ईंदरराव चौरे (वय ४१) हे शेतकरी रविवारी (दि. २५ ऑक्टोबर) सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास कवडगाव शिवारातील आपल्या शेतातून काम आटोपून घरी परतत होते. वाटेत गावातीलच रामेश्वर वैजीनाथ लोंढे याने त्यांना अडवले आणि जुन्या वादाचा राग काढत त्यांच्या डोक्यात काठीने जोरदार प्रहार केला.
या अचानक झालेल्या हल्ल्यात उत्तरेश्वर चौरे यांचे डोके फुटले असून ते गंभीर जखमी झाले आहेत. उपचारांनंतर दुसऱ्या दिवशी, सोमवारी (दि. २६ ऑक्टोबर) दुपारी उत्तरेश्वर चौरे यांनी वडवणी पोलीस ठाणे गाठून याप्रकरणी अधिकृत फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी रामेश्वर लोंढे याच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१) नुसार गुन्हा दाखल केला आहे.
भरदिवसा घडलेल्या या मारहाणीच्या प्रकारामुळे कवडगाव परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ग्रामीण भागात जुन्या वैमनस्यातून असे हल्ले होत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल ढोबळे हे करत आहेत.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!