वडवणी: तालुक्यातील हरिश्चंद्र पिंपरी ग्रामपंचायत हद्दीत राजरोसपणे सुरू असलेली अवैध दारू विक्री कायमस्वरूपी बंद करावी, या मागणीसाठी संतप्त ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीच्या वतीने वडवणी पोलिस ठाण्यात नुकतेच निवेदन देण्यात आले. या अवैध व्यवसायामुळे गावातील शांतता आणि सुव्यवस्था धोक्यात आली असून, महिला, विद्यार्थी व ज्येष्ठांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने कारवाई न झाल्यास तीव्र रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
शाळा आणि मंदिराजवळ दारूची विक्री
गावातील तांड्यावर दोन ठिकाणी अवैध दारूची विक्री होत असल्याचा गंभीर आरोप निवेदनात करण्यात आला आहे. अत्यंत संतापजनक बाब म्हणजे, हे कथित अड्डे जिल्हा परिषद शाळा आणि देशातील एकमेव राजा हरिश्चंद्र मंदिरापासून अवघ्या शंभर मीटर अंतरावर आहेत. यामुळे शाळेत जाणारे विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. दारू विक्री व सेवनामुळे गावात तळीरामांचा वावर वाढला असून चोरीच्या घटनांमध्येही वाढ झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
पोलिसांकडे कठोर कारवाईची मागणी
यापूर्वी संबंधितांना समज देऊन आणि प्रशासनाचे लक्ष वेधूनही हा गोरखधंदा सुरूच असल्याने ग्रामस्थांचा संयम आता सुटला आहे. अवैध दारू विक्रीची तातडीने सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी सरपंच दिनकर शिंदे आणि ग्रामस्थांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक वर्षा व्हगाडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी ह.भ.प. भगवान महाराज राजपूत यांच्यासह भागवत शिंदे, भीमराव काकडे, शंकर जाधव, धनंजय जाधव, सत्यप्रेम राठोड आणि बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!