वडवणी तालुक्यातील चिंचोटी शिवारात शेतातील गोठ्यात बांधलेल्या दोन दुभत्या गाभण म्हशी अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री चोरून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. १३ ऑक्टोबरच्या रात्री ते १४ ऑक्टोबरच्या सकाळदरम्यान घडलेल्या या चोरीमुळे शेतकऱ्याचे १ लाख ८७ हजार रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

मामला येथील रहिवासी शेतकरी व वकील गोविंद शिवाजी लांगे यांनी आपल्या चिंचोटी शिवारातील शेत गट क्रमांक २३५ मधील गोठ्यात जनावरे बांधली होती. यामध्ये प्रत्येकी नऊ महिन्यांच्या गाभण असलेल्या दोन म्हशींचा समावेश होता. मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी शेतात प्रवेश करून गोठ्यातील म्हशींचे दावणे अलगद सोडले आणि त्यांना लंपास केले. सकाळी शेतात जनावरांना चारा टाकण्यासाठी गेले असता म्हशी गायब असल्याचे उघडकीस आले. परिसरात शोध घेऊनही म्हशी मिळून न आल्याने शेतकऱ्याने वडवणी पोलीस ठाण्यात धाव घेतली. गोविंद लांगे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा नोंदवला असून पोलीस हवालदार ढोबळे तपास करत आहेत.