परळी शहरातील शिवाजीनगर भागात पत्नीने वेळीच दाखवलेले प्रसंगावधान आणि पोलिसांनी काही मिनिटांतच घेतलेली धाव, यामुळे आत्महत्येच्या प्रयत्नात असलेल्या एका तरुणाचा जीव थोडक्यात बचावला आहे. बुधवारी सकाळी पावणे नऊ वाजेच्या सुमारास ही हृदयद्रावक घटना घडली.

शिवाजीनगर भागात राहणाऱ्या एका महिलेने बुधवारी सकाळी घाबरलेल्या अवस्थेत ११२ या आपत्कालीन क्रमांकावर फोन केला. 'माझा पती आत्महत्या करत असून त्याने घराचा दरवाजा आतून लावून घेतला आहे,' अशी माहिती तिने दिली. या कॉलची माहिती मिळताच संभाजीनगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी गणेश येरडलावार यांनी महिलेशी सतत संपर्क ठेवत परिस्थिती जाणून घेतली. क्षणाचाही विलंब न लावता येरडलावार आणि पोलीस जमादार पठाण यांनी थेट घटनास्थळ गाठले.

पोलिसांनी तातडीने घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला, तेव्हा संबंधित व्यक्तीने साडीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे थरारक दृश्य समोर आले. पोलिसांनी क्षणाचाही विचार न करता त्याला खाली उतरवले आणि गळफास सोडवून प्राथमिक मदत दिली, ज्यामुळे त्याचे प्राण वाचले. यानंतर पोलिसांनी त्याची समजूत काढत त्याला शांत केले. पोलिसांच्या या देवदूतासारख्या मदतीबद्दल पत्नीने आभार मानले असून, सर्व स्तरांतून पोलिसांच्या तत्परतेचे मोठे कौतुक होत आहे.