परळी वैजनाथ (बीड): पारंपरिक ऊस शेतीला रेशीम शेतीची जोड देत परळी तालुक्यातील पिंपरी बुद्रुक येथील शेतकऱ्यांनी अवघ्या दोन महिन्यांत पहिल्या रेशीम कोष उत्पादनाचे यश संपादन केले आहे. शेतकऱ्यांच्या या नाविन्यपूर्ण प्रयोगाची दखल घेत उपविभागीय कृषी अधिकारी राहुल गायकवाड आणि मंडळ कृषी अधिकारी कारभारी पौळ यांनी रेशीम संगोपन केंद्रांना प्रत्यक्ष भेट देऊन शेतकऱ्यांचे कौतुक केले.

संस्थात्मक समन्वयातून शेतीला नवी दिशा

नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोकरा) योजनेंतर्गत कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली ग्लोबल विकास ट्रस्ट आणि ए.यू. स्मॉल फायनान्स बँक यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविला जात आहे. या प्रकल्पात ग्लोबल विकास ट्रस्टमार्फत शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यात आले, तर ए.यू. स्मॉल फायनान्स बँकेकडून आवश्यक आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात आले. शासकीय यंत्रणा, सामाजिक संस्था आणि बँक यांच्या एकत्रित प्रयत्नांतून शेतकऱ्यांना रेशीम शेती सुरू करणे सुलभ झाले.

कृषी विभागाकडून सर्वतोपरी सहकार्याची ग्वाही

या भेटीदरम्यान उपविभागीय कृषी अधिकारी राहुल गायकवाड यांनी शेतकऱ्यांचे व ग्लोबल विकास ट्रस्टच्या कार्याचे अभिनंदन केले. तसेच, भविष्यात रेशीम शेतीचा अधिक विस्तार करण्यासाठी कृषी विभागाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. मंडळ कृषी अधिकारी कारभारी पौळ यांनीही रेशीम कोष उत्पादनवाढीसाठी आणि तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी कृषी विभाग कायम शेतकऱ्यांच्या पाठीशी राहील, असे स्पष्ट केले. पिंपरी बुद्रुक येथील शेतकऱ्यांचे हे यश परिसरातील इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.