माजलगाव शहरातील पंचशीलनगर भागात जुन्या वादाची कुरापत काढून तरुणासह त्याच्या आईला मारहाण करत तोंडावर दगड फेकून दात पाडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. २९ सप्टेंबर रोजी रात्री अकरा वाजता मनोज अशोकराव शिनगारे हे घरासमोर असताना हा प्रकार घडला. स्थानिक रहिवासी युवराज मुरलीधर साळवे, आकाश साळवे, अनिल साळवे आणि गिरिजाबाई साळवे यांनी संगनमत करून शिनगारे यांच्याशी वाद घातला. आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या आईला अश्लील शिवीगाळ करत मारहाण केली. यावेळी युवराज साळवे याने मनोज यांच्या तोंडावर जोरात दगड मारल्याने त्यांचा दात तुटून ते गंभीर जखमी झाले. आरोपींनी त्यांना जीवे मारण्याची धमकीही दिली. पोलीस ठाण्यात उशिरा दिलेल्या तक्रारीवरून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाने चारही आरोपींविरुद्ध माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून महिला पोलीस अंमलदार मस्के तपास करत आहेत.