केज : केज तालुक्यातील जानेगाव येथे प्रेमविवाह केल्याच्या कारणावरून मुलीच्या आई-वडिलांनी आणि त्यांच्या साथीदारांनी जावयासह सासू-सासरे आणि दीरावर दगडाने हल्ला करून मारहाण केल्याची धक्कादायक घटना १९ नोव्हेंबर रोजी घडली आहे. नवविवाहित वधूला जबरदस्तीने माहेरी नेण्यास विरोध केल्याने हा राडा झाला असून, याप्रकरणी युसुफवडगाव पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाहुणचारानंतर बोलावले साथीदार
जानेगाव (ता. केज) येथील आशिष मन्मथ पारवे हा पुणे जिल्ह्यातील वासुली (ता. खेड) येथे एका खाजगी कंपनीत नोकरीस आहे. तेथे त्याचे चाकण येथील एका तरुणीशी प्रेमसंबंध जुळले आणि दोघांनी आळंदी येथे विवाह केला. विवाहानंतर हे नवदाम्पत्य जानेगाव येथे राहण्यासाठी आले होते. याची माहिती मिळताच १९ नोव्हेंबर रोजी मुलीची आई अनुसया सुरेश दोनगहू या जानेगाव येथे आल्या. पारवे कुटुंबीयांनी त्यांचा चहापाणी देऊन योग्य पाहुणचार केला. मात्र, त्यानंतर अनुसया यांनी पती सुरेश दोनगहू यांना फोन करून गावी बोलावून घेतले.
दगडाने हल्ला आणि गुन्हा दाखल
सुरेश दोनगहू हे दोन अनोळखी इसमांसोबत जानेगाव येथे पोहोचले आणि त्यांनी नवविवाहितेला जबरदस्तीने चाकण येथे नेण्यासाठी ओढाताण सुरू केली. आशिष व त्याच्या आई-वडिलांनी सुनेला नेण्यास विरोध करताच सासरा सुरेश, सासू अनुसया आणि त्यांच्या साथीदारांनी शिवीगाळ करत कुटुंबाला मारहाण केली. या झटापटीत आशिषच्या भावाच्या डोक्यात दगड मारून त्याला गंभीर जखमी केले.
आशिष पारवे यांच्या तक्रारीवरून युसुफवडगाव पोलिसांनी सुरेश दोनगहू, अनुसया दोनगहू आणि दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मांजरमे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल केशव बिक्कड या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!