माजलगाव: शहरात सुरू असलेल्या अंमली पदार्थांच्या अवैध व्यवहारांवर माजलगाव शहर पोलिसांनी जोरदार कारवाई करत तिघांना रंगेहात ताब्यात घेतले आहे. सादोळा रोडवरील केदारेश्वर नगर कमानीसमोर सोमवारी, २ नोव्हेंबर रोजी पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली. या कारवाईत संशयितांकडून ७३० ग्रॅम अंमली पदार्थ आणि एक दुचाकी असा एकूण सुमारे सव्वा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, या कारवाईमुळे अवैध व्यवसायिकांचे धाबे दणाणले आहेत.

सापळा रचून तिघांना घेतले ताब्यात

केदारेश्वर नगर परिसरात अंमली पदार्थांची विक्री होणार असल्याची गोपनीय माहिती गुप्त बातमीदाराकडून शहर पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सादोळा रोडवर पाळत ठेवली. हालचाली संशयास्पद वाटताच पथकाने छापा टाकून सदाशिव शिवलिंग कलंत्रे, भारत सरवदे आणि अजय गोरे या तिघांना ताब्यात घेतले. त्यांची झाडाझडती घेतली असता त्यांच्याकडे १४ हजार रुपये किमतीचा ७३० ग्रॅम अंमली पदार्थ आढळून आला. हा साठा गांजा असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

फॉरेन्सिक तपासणी सुरू; सव्वा लाखांचा मुद्देमाल हस्तगत

पोलिसांनी घटनास्थळावरून अमली पदार्थासह वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली एमएच ४४ एएच ३५८५ क्रमांकाची दुचाकी असा एकत्रित १ लाख २५ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. जप्त केलेला पदार्थ नेमका कोणता आहे, याची खातरजमा करण्यासाठी नमुने फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. ही धडक कारवाई पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे, सहायक पोलीस निरीक्षक कल्याण नेहरकर व पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली विजय गायकवाड, घोडके, विक्रम चव्हाण, महादेव बहिरवाळ, संतराम थापडे आणि स्नेहल परदेशी यांच्या पथकाने केली असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.