माजलगाव: येथील 'माऊली हार्ट अँड क्रिटिकल केअर' रुग्णालयात उपचारादरम्यान एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने संतापलेल्या नातेवाईकांनी डॉक्टरांना व कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण करत धक्काबुक्की केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. एवढेच नव्हे तर, रुग्णालयाच्या कॅबिनमध्ये डॉक्टरांना तब्बल सहा ते सात तास डांबून ठेवत, खोट्या ॲट्रॉसिटी केसेस दाखल करण्याची धमकी दिल्याची धक्कादायक माहितीही समोर आली आहे. या गंभीर प्रकरणी डॉ. राधाकिसन डाके यांच्या फिर्यादीवरून माजलगाव शहर पोलीस ठाण्यात १० जणांसह इतर अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रुग्णाच्या मृत्यूनंतर उडाला गोंधळ
फिर्यादीत नमूद केल्यानुसार, २९ सप्टेंबर रोजी भगवान विठ्ठल साळवे यांना छातीत दुखत असल्याने रुग्णालयात आणले होते. त्यावेळी त्यांना केवळ गोळ्या औषधे देऊन नंतर ॲडमिट होण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्यानंतर २ ऑक्टोबर रोजी त्यांची प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. रुग्णाच्या नातेवाईकांना उपचारातील धोक्याची कल्पना देऊन लेखी संमतीपत्रही घेण्यात आले होते. मात्र, ३ ऑक्टोबर रोजी उपचारादरम्यान कार्डियाक अरेस्टमुळे भगवान साळवे यांचा मृत्यू झाला.

मृत्यूची बातमी मिळताच रुग्णाचे नातेवाईक पंकज साळवे, विलास साळवे आणि तुळशीराम साळवे यांच्यासह इतरांनी रुग्णालयात मोठा गोंधळ घातला. योग्य उपचार न केल्याचा आरोप करत त्यांनी डॉ. डाके, डॉ. ऋतुजा यलमोटे आणि इतर नर्सिंग स्टाफला शिवीगाळ करत मारहाण केली.

डॉक्टरांना डांबले आणि डाटा पळवला
रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी डॉ. डाके यांना कॉलर पकडून त्यांच्या कॅबिनमध्ये नेले आणि तिथे त्यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनाही मारहाण केली. आरोपी विलास साळवे याने कॉन्फिडेन्शियल डाटा असलेले आयपीडी रजिस्टर जबरदस्तीने ताब्यात घेऊन त्याच्या झेरॉक्स काढल्या आणि त्या सत्यप्रत म्हणून प्रमाणित करून घेतल्या. तसेच कॅबिनमधील सीसीटीव्ही फुटेजही पेनड्राईव्हमध्ये कॉपी करून घेतले. डॉक्टरांना तब्बल सहा ते सात तास त्यांच्याच कॅबिनमध्ये डांबून ठेवत मानसिक छळ केला आणि खोट्या ॲट्रॉसिटी केसेस दाखल करण्याची धमकी दिली. या सर्व प्रकारामुळे भयभीत झालेल्या डॉ. डाके यांनी ६ ऑक्टोबर रोजी माजलगाव शहर पोलिसांत धाव घेत फिर्याद दिली. पोलिसांनी पंकज साळवे, विलास साळवे, तुळशीराम साळवे, आदित्य साळवे,
प्रेम साळवे, प्रमोद सोनवणे, बाळासाहेब लहाडे, सचिन लहाडे, अशोक साळवे आणि संदेश डोंगरे यांच्यासह काही अज्ञात आरोपींवर महाराष्ट्र मेडीकेअर सर्व्हिस पर्सन्स ॲन्ड मेडीकल सर्व्हिस इन्स्टिट्यूशन्स ॲक्ट २०१० तसेच भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कल्याण नेहरकर करत आहेत.