माजलगाव: तालुक्यातील लोणगाव शिवारातील 'हॉटेल जुगाड' येथे सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक (AHTU) कक्षाने २८ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री धडक कारवाई केली. स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी एका पिडीत महिलेकडून वेश्याव्यवसाय करवून घेणाऱ्या संतोष तुकाराम चव्हाण आणि त्याची दुसरी पत्नी कोमल संतोष पवार (चव्हाण) यांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले असून, त्यांच्यावर दिंद्रुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डमी ग्राहकाद्वारे रचला सापळा
माजलगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक अनंत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली एएचटीयु बीडच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक जनाबाई सांगळे यांच्या पथकाने ही कारवाई केली. गोदावरी तांडा परिसरातील या हॉटेलमध्ये बाहेरून महिला बोलावून वेश्याव्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. याची शहानिशा करण्यासाठी पोलिसांनी डमी ग्राहक पाठवून एक हजार रुपयांचा व्यवहार निश्चित केला. डमी ग्राहकाने इशारा करताच दबा धरून बसलेल्या पथकाने रात्री ८.४० वाजता हॉटेलवर छापा मारला. यावेळी आरोपी संतोष चव्हाण याच्याकडे छापापूर्व पंचनाम्यात नमूद केलेल्या ५०० रुपयांच्या दोन नोटा आढळून आल्या.
पिडीत महिलेची सुटका, मुद्देमाल जप्त
या कारवाईदरम्यान एका २८ वर्षीय पिडीत महिलेची सुटका करण्यात आली. चौकशीत समोर आले की, आरोपी पती-पत्नी या महिलेचे शोषण करत होते आणि प्रत्येक ग्राहकाकडून मिळणाऱ्या एक हजार रुपयांपैकी केवळ पाचशे रुपये तिला देत असत. पोलिसांच्या अंगझडतीत महिला आरोपी कोमल हिच्याकडे ५५०० रुपये रोख, तर घटनास्थळावर निरोध आणि इतर रक्कम असा एकूण ६५०० रुपयांचा मुद्देमाल सापडला. याप्रकरणी संतोष चव्हाण, कोमल चव्हाण आणि हॉटेलचा अज्ञात मालक यांच्यावर अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा १९५६ च्या विविध कलमांसह भारतीय न्याय संहितेच्या कलम ३(५) अंतर्गत २९ सप्टेंबर रोजी सकाळी एफआयआर दाखल करण्यात आला आहे.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!