दरवर्षी १४ नोव्हेंबर रोजी जगभरात जागतिक मधुमेह दिन (World Diabetes Day) साजरा केला जातो. हा दिवस डॉ. फ्रेडरिक बँटिंग यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा केला जातो, ज्यांनी इन्सुलिनचा शोध लावून जगभरातील कोट्यवधी लोकांचे प्राण वाचवले.
मधुमेह म्हणजे काय हे सर्वांना माहीत असले, तरी त्याचे गंभीर परिणाम अजूनही लोकांना समजलेले नाहीत. त्यामुळे लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे, लवकर निदान आणि योग्य नियंत्रण हे या दिवसाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
मधुमेह हा शरीरातील इन्सुलिन या हार्मोनच्या कमतरतेमुळे होणारा आजार आहे. इन्सुलिन हे शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवते. जेव्हा इन्सुलिन नीट कार्य करत नाही, तेव्हा रक्तातील साखर वाढते आणि त्यामुळे शरीराच्या अनेक अवयवांवर परिणाम होतो.
मधुमेहाचे तीन मुख्य प्रकार आहेत:
Type - 1 मधुमेह: हा प्रकार बालपणी किंवा तरुण वयात होतो, जेव्हा शरीरात इन्सुलिन तयारच होत नाही.
Type - 2 मधुमेह: हा सर्वसाधारण प्रकार असून चुकीचा आहार, लठ्ठपणा (जाडी), ताणतणाव, आणि निष्क्रिय जीवनशैली यांमुळे होतो.
गर्भधारणेदरम्यानचा मधुमेह: हा असा मधुमेह आहे, जो गर्भावस्थेदरम्यान प्रथमच आढळतो.
आज भारताला जगभरात "मधुमेहाची राजधानी" म्हटले जाते. भारतामध्ये जेवढे मधुमेही लोक आहेत त्याहून अधिक लोक प्री-डायबेटिक म्हणजेच धोक्याच्या टप्प्यावर आहेत. आजकाल अनेक लोक बसून काम करतात, कमी व्यायाम करतात, जंक फूड आणि गोड पदार्थ जास्त खातात. या सवयींमुळे शरीरात इन्सुलिन नीट कार्य करत नाही आणि मधुमेह होतो.
भारतीय लोकांमध्ये नैसर्गिकरित्या इन्सुलिन प्रतिकार (Insulin resistance) जास्त दिसून येतो. त्यामुळे इतर देशांच्या लोकांपेक्षा आपल्याला मधुमेह होण्याची शक्यता जास्त असते. शहरांमधील ताण, झोपेचा अभाव आणि असंतुलित जीवनशैली हीदेखील कारणे आहेत. भारतात अनेक लोकांना आपल्याला मधुमेह आहे, हेच माहीत नसते. त्यामुळे आजार वाढेपर्यंत उपचार सुरू होत नाहीत.
मधुमेहाबद्दल जागरूकता ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जागरूकता वाढल्याने लोक नियमित तपासणी करतात व मधुमेहाचे लवकर निदान करू शकतात. टाइप-2 मधुमेह योग्य जीवनशैली ठेवून टाळता येतो किंवा उशिरा येऊ शकतो. जागरूकता लोकांना संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि योग्य वजन राखणे याबद्दल माहिती देते. ज्यांना मधुमेह आहे, त्यांनी जागरूकतेमुळे ब्लड शुगर, रक्तदाब आणि कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवल्यास भविष्यात होणारे मधुमेहाचे गंभीर परिणाम टाळता येतात. परिणामी आरोग्यावरील खर्च कमी होईल आणि समाज अधिक निरोगी बनेल.
या सर्व कारणांमुळे 'मधुमेहाविषयी जागरूकता म्हणजे आरोग्याकडे जाणारे पहिले पाऊल' असे म्हणता येईल. दर मिनिटाला नवीन रुग्ण ओळखला जातो आणि दर मिनिटाला कुणाचा तरी अवयव या आजारामुळे प्रभावित होतो.
मधुमेह हा फक्त साखरेचा आजार नाही. तो हळूहळू शरीरातील अनेक अवयवांचे नुकसान करतो; जसे की डोळ्यांची दृष्टी कमी होणे किंवा अंधत्व येणे, मूत्रपिंड निकामी होणे, हृदयरोग, हार्ट अटॅक, पायांच्या नसा व रक्तपुरवठा कमी होऊन पाय कापावा लागण्याची वेळ येणे.
संशोधन सांगते की, जर HbA1c (साखरेचा दीर्घकालीन मापक) फक्त १ टक्क्याने कमी केला, तर डोळे, किडनी आणि हृदयावरील धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो.
मधुमेह टाळता आणि नियंत्रित करता येतो, फक्त थोडे शिस्तबद्ध जीवन हवे.
संतुलित आहार घ्या. जास्त साखर, पांढरा भात, मैदा, तेलकट आणि तळलेले पदार्थ टाळा.
दररोज व्यायाम करा. किमान ३० मिनिटे चालणे, योगा किंवा सायकलिंग करा.
नियमित तपासणी करा. उपाशीपोटी व जेवणानंतरची साखर, तसेच HbA1c दर ३-६ महिन्यांनी तपासा.
ताणतणाव कमी ठेवा. ध्यान, प्राणायाम आणि छंद यांचा वापर करा.
मद्यपान व धूम्रपान टाळा. हे साखरेवर आणि हृदयावर वाईट परिणाम करतात.
औषधे वेळेवर घ्या. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे थांबवू नका. या वर्षीच्या जागतिक मधुमेह दिनाचा संदेश आहे, "मधुमेहावर नियंत्रण, आरोग्यपूर्ण जीवनाचे संरक्षण". हे फक्त घोषवाक्य नाही, तर आपल्या जीवनशैलीचा संकल्प आहे.
आपण स्वतः सजग झालो, तर आपल्या कुटुंबाला, समाजाला आणि देशाला या आजारापासून वाचवू शकतो.
चला, या दिवशी आपण सगळ्यांनी एक निश्चय करूया:
दररोज आरोग्याकडे लक्ष देऊ,
साखरेवर नियंत्रण ठेवू,
आणि मधुमेहमुक्त भारत घडवू.
– डॉ. अतुल शिंदे
मधुमेहतज्ज्ञ
संचालक, योगेश्वरी डायबेटिस केअर सेंटर













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!