अंबाजोगाई : बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी आज अंबाजोगाई तालुक्यातील मौजे कानडी बदन येथे भेट देऊन 'जय किसान सेंद्रिय महिला व पुरुष गटाच्या' सदस्यांसोबत संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी गावातील महिला व पुरुष गटांच्या सदस्यांसोबत दिवाळीचा फराळ घेत त्यांचा उत्साह वाढवला. गटाच्या कामकाजातील अडचणी जाणून घेत, बचत गटांनी केवळ बचतीपुरते मर्यादित न राहता व्यवसाय वृद्धीला प्राधान्य द्यावे, असे मोलाचे मार्गदर्शन त्यांनी केले. या भेटीबद्दल ग्रामस्थ व गटाच्या सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे विशेष आभार मानले.

दुष्काळग्रस्तांना तातडीने मदत देण्याची मागणी

या दौऱ्याप्रसंगी 'अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती'च्या बीड जिल्हा महिला आघाडीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. जिल्ह्यातील गंभीर दुष्काळी परिस्थितीत शेतकरी, शेतमजूर, भूमिहीन मजूर, एकल महिला, ऊसतोड कामगार आणि बांधकाम कामगारांपर्यंत शासनाची मदत पोहोचत नसल्याची खंत व्यक्त करत तातडीने मदतकार्य सुरू करण्याची मागणी समितीच्या महिला जिल्हाध्यक्ष सौ. ज्योती साखरे यांनी केली.

निवेदनातील प्रमुख मागण्या:

  • गरजूंसाठी गावोगावी तात्काळ अन्नछत्र सुरू करणे.

  • मजुरांच्या हाताला तात्काळ रोजगार उपलब्ध करून देणे.

  • गावातील पिण्याच्या पाण्याची सुयोग्य व्यवस्था करणे.

  • जनावरांसाठी चारा छावण्या तातडीने सुरू करणे.

  • ई-पीक पाहणीतील तांत्रिक अडचणी लक्षात घेता सर्व शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा मंजूर करणे.

  • सर्व उपेक्षित व गरजू लाभार्थ्यांना अन्नसुरक्षा किटचे वाटप करणे.

याप्रसंगी उपविभागीय अधिकारी दीपक वजाळे, तहसीलदार अशोक भंडारे, मंडळ कृषी अधिकारी प्रशांत वाघमारे, कृषी सहाय्यक भाग्यश्री पतंगे, मंडळ अधिकारी लक्ष्मण ढाकणे, कानडी बदनचे सरपंच गणेश जगदाळे, ग्रामसेवक पूजा मॅडम, समितीच्या पदाधिकाऱ्यांसह जय किसान शेतकरी व बचत गटाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.