अंबाजोगाई: जिल्ह्यातील सध्याची दुष्काळी परिस्थिती पाहता शेतकरी, शेतमजूर आणि कष्टकरी वर्गावरील आर्थिक भार कमी करण्यासाठी बीड जिल्हा प्रशासनातर्फे तालुका स्तरावर सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या निर्देशानुसार सामाजिक न्याय विभाग, जिल्हा महसूल प्रशासन आणि सहाय्यक आयुक्त समाजकल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत असून, अंबाजोगाई शहर व तालुक्यातील नागरिकांनी आपल्या पाल्यांचा विवाह या सोहळ्यातच करावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी दीपक वजाळे आणि तहसीलदार विलास तरंगे यांनी केले आहे.
सोहळ्याच्या नियोजित तारखा
तहसीलदार विलास तरंगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यात तालुका स्तरावर नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात एकूण सहा दिवस हे विवाह सोहळे पार पडणार आहेत. यामध्ये बुधवार दि. २५ व गुरुवार दि. २६ नोव्हेंबर २०२६, तसेच डिसेंबर महिन्यात सोमवार दि. १४ व मंगळवार दि. १५ डिसेंबर आणि बुधवार दि. ३० व गुरुवार दि. ३१ डिसेंबर २०२६ रोजी सामूहिक विवाह सोहळे आयोजित करण्यात आले आहेत.
शासकीय अनुदान आणि नोंदणी प्रक्रिया
दुष्काळी परिस्थितीचा फटका विवाह ठरलेल्या जोडप्यांना बसू नये आणि सामूहिक विवाहास प्रोत्साहन मिळावे, हा यामागील मुख्य उद्देश आहे. या सोहळ्यात विवाहबद्ध होणाऱ्या अनुसूचित जाती-जमाती, नवबौद्ध, विमुक्त जाती-भटक्या जमाती आणि इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रवर्गातील प्रत्येक दाम्पत्यास शासनाकडून २५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य (अनुदान) दिले जाणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक वधू-वरांच्या पालकांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून बालविकास प्रकल्प अधिकारी, गटविकास अधिकारी किंवा तहसीलदार कार्यालयाशी संपर्क साधून रीतसर नोंदणी करावी, असे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!