दिवाळीच्या सणासाठी नागपूरहून गावी सोलापूरला जाणाऱ्या कुटुंबावर वाटेतच काळाने घाला घातला आहे. अहमदपूर-अंबाजोगाई रस्त्यावर भरधाव वेगात चुकीच्या दिशेने आलेल्या एका ट्रकने कारला दिलेल्या जोराच्या धडकेत सहा वर्षांच्या निष्पाप चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही हृदयद्रावक घटना ७ नोव्हेंबर रोजी दुपारी सव्वा एक वाजेच्या सुमारास कांगणेवाडी पाटीसमोर मुरकुटवाडी शिवारात घडली.
वैभव बळीराम लोकरे हे आपली पत्नी प्राजक्ता, मुलगा रनक (वय ६ वर्षे) आणि मुलगी राज्ञी यांच्यासोबत त्यांच्या कारने (MH45AL9683) उजणी (ता. माढा) येथे त्यांच्या गावी जात होते. त्यावेळी समोरून अत्यंत निष्काळजीपणे आणि चुकीच्या दिशेने आलेल्या ट्रकने (MH15JW8451) त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत कार रस्त्याच्या खड्ड्यात जाऊन पलटी झाली. या अपघातात वैभव आणि त्यांच्या पत्नीला मुका मार लागला, मात्र त्यांचा मुलगा रनक याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचे प्रचंड रक्तस्राव झाले. त्याला तातडीने अहमदपूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
अपघात एवढा भीषण होता की ट्रक चालक जखमींना मदत न करता न थांबता घटनास्थळावरून पसार झाला. याप्रकरणी वैभव लोकरे यांच्या फिर्यादीवरून १२ नोव्हेंबर रोजी बीड जिल्ह्यातील बर्दापूर पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!