बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहर पोलिसांनी दिवाळीच्या पूर्वसंध्येला सर्वसामान्य नागरिकांना एक अतिशय अनोखी आणि सुखद भेट दिली आहे. पोलिसांच्या विशेष पथकाने 'CEIR' पोर्टलच्या माध्यमातून तब्बल २ ते अडीच लाख रुपये किमतीचे चोरीला गेलेले आणि हरवलेले १४ मोबाईल शोधून काढून ते मूळ मालकांना सन्मानपूर्वक परत केले आहेत. ऐन सणाच्या दिवशी आपला हरवलेला महागडा मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर मोठा आनंद ओसंडून वाहत होता.
पोलीस अधीक्षक नवनीत कावत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांच्या पथकाने ही यशस्वी कामगिरी केली. या शोधमोहिमेत पोलीस उपनिरीक्षक रमेश घुले आणि अंमलदार रवी कुमार केंद्रे यांनी तांत्रिक कौशल्याचा वापर करत विशेष मेहनत घेतली. अंबाजोगाई शहर पोलिसांच्या या तत्पर व लोकोपयोगी कामगिरीचे सर्व स्तरांतून मोठे कौतुक होत आहे.
ज्या नागरिकांचे मोबाईल चोरीला गेले आहेत किंवा गहाळ झाले आहेत, त्यांनी निराश न होता तात्काळ पोलीस ठाण्यात आपली तक्रार नोंदवावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांनी केले आहे. तक्रार करताना मोबाईलचा आयएमईआय (IMEI) क्रमांक आणि पक्के बिल सोबत आणावे, जेणेकरून त्याचा शोध घेणे सोपे होईल. नागरिकांची मालमत्ता सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत, असा विश्वास पोलिसांनी दिला आहे.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!