गेवराई तालुक्यातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र राक्षसभुवनला जोडणाऱ्या सिमेंट रस्त्याच्या मधोमध मोठ्या भेगा पडल्याने अपघातांचे सत्र सुरू झाले आहे. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. धुळे-सोलापूर महामार्गावरील राक्षसभुवन फाटा ते शनी चौकापर्यंतचा हा रस्ता सात-आठ वर्षांपूर्वी २० कोटी रुपये खर्चून बनवला होता. शनी अमावस्या व दशक्रिया विधीसाठी येथे देशभरातून भाविकांची मोठी वर्दळ असते. मात्र, रस्त्याच्या दुरवस्थेकडे गेवराई सार्वजनिक बांधकाम विभाग पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे. अपघातांचा वाढता धोका पाहता रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची तीव्र मागणी नागरिक करत आहेत. याविषयी बांधकाम विभागाचे सहायक अभियंता बी. एस. गोचीडे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.