बीड : जिल्ह्यातील सध्याच्या दुष्काळजन्य परिस्थितीत स्थानिक मजुरांच्या हाताला काम मिळावे आणि भविष्यासाठी जास्तीत जास्त जलसाठा निर्माण व्हावा, यासाठी पाणलोट व जलसंधारणाच्या कामांना सर्वोच्च प्राधान्य देणे अत्यंत गरजेचे आहे, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित चारा लागवड, जलतारा प्रकल्प आणि दुष्काळ निवारण कामांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहेमान, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष साळवे यांच्यासह सर्व तहसीलदार आणि गटविकास अधिकारी ऑनलाइन प्रणालीद्वारे उपस्थित होते.
भूजल पातळी वाढीसाठी 'जलतारा' प्रकल्पाला गती
भूजल पातळीत झपाट्याने वाढ करण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या शेतात 'जलतारा' प्रकल्पांतर्गत शोषखड्ड्यांची निर्मिती करावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. या खड्ड्यांमधील खडीच्या थरांमुळे पावसाचे वाहून जाणारे पाणी फिल्टर होऊन जमिनीत खोलवर मुरते. जॉबकार्डच्या उपलब्धतेनुसार प्रत्येक गावात वर्षाला ५० पेक्षा जास्त जलतारा कामे घेण्याची सवलत असल्याचेही जॉन्सन यांनी यावेळी स्पष्ट केले.
चारा टंचाई व मजूर उपस्थितीवर प्रशासनाची करडी नजर
जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होऊ नये यासाठी कमी पाण्यात आणि कमी कालावधीत जलद उत्पादन देणाऱ्या चारा पिकांच्या वाणांची माहिती घेऊन त्यांनी कृषी विभागाला योग्य त्या सूचना दिल्या. तसेच, जिल्ह्यातील घरकुल, विहीर आणि जलतारा प्रकल्पावर कार्यरत असलेल्या मजुरांच्या उपस्थितीचा आढावा घेत, गरजू मजुरांना तात्काळ रोजगार उपलब्ध करून देण्याचे आणि दुष्काळ निवारणाची कामे प्राधान्याने हाताळण्याचे आदेश त्यांनी सर्व तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांना दिले.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!