बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे अपहरण झाल्याचा बनाव करून डायल ११२ वर आपत्कालीन मदतीसाठी खोटा कॉल करणाऱ्या एका तरुणाविरुद्ध माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपत्कालीन यंत्रणेचा गैरवापर करून पोलिसांची दिशाभूल केल्याचा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
बुधवारी (११ नोव्हेंबर) रात्री पावणे बाराच्या सुमारास डायल ११२ वर एका व्यक्तीने कॉल करून आपल्याला ट्रॅव्हल्सच्या डिक्कीत कोंडून अपहरण केले असून जिवाला धोका असल्याची खोटी माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून माजलगाव ग्रामीणचे पोलीस अंमलदार आकाश अडागळे आणि त्यांच्या पथकाने तत्काळ मोबाईल लोकेशन ट्रेस केले. सुरुवातीला हे लोकेशन गंगामसला येथील मोरेश्वर हॉटेलजवळ आणि नंतर गेवराई हद्दीत आढळले.
गेवराई पोलिसांच्या मदतीने मादळमोही बसस्थानकासमोर ट्रॅव्हल्स बस अडवून तपासणी केली असता, कॉल करणारा भागवत संभाजी चौरे (वय २५, रा. सायाळा, जि. परभणी) हा तरुण डिक्कीत नसून बसच्या कॅबिनमध्ये सुरक्षित आणि हसत बसलेला आढळला. दारूच्या नशेत पोलिसांना त्रास देण्यासाठी त्याने हा खोटा कॉल केल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी पोलिसांचा वेळ वाया घालवल्याबद्दल त्याच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम २१२ आणि २२३ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!