माजलगाव, दि. २७ : माजलगाव बसस्थानकात बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेऊन एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरून पसार झालेल्या चोरट्याला माजलगाव शहर पोलिसांनी अवघ्या सात तासांत जेरबंद केले आहे. पोलिसांनी या कारवाईत चोरीला गेलेले साडेपाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणीमंगळसूत्र (किंमत ७० हजार रुपये) आणि गुन्ह्यात वापरलेली काळ्या रंगाची होंडा शाईन दुचाकी असा मुद्देमाल जप्त केला आहे.

गुरुवारी (दि. २६ नोव्हेंबर) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास फिर्यादी महिला माजलगाव बसस्थानकावर बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लांबवले होते. याप्रकरणी शुक्रवारी (दि. २७) मध्यरात्री एक वाजता माजलगाव शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे कारवाई

गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तांत्रिक बाबींचे विश्लेषण सुरू केले. दरम्यान, पोलीस कॉन्स्टेबल महेश चव्हाण यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून आरोपीबाबत खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून किरण लक्ष्मण जाधव (वय २३, रा. मंठा, जि. जालना) याला ताब्यात घेतले. चौकशीअंती त्याच्याकडून चोरीचे मंगळसूत्र आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल हस्तगत करण्यात आली.

ही धडाकेबाज कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत व उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक अनंत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे, पोलीस उपनिरीक्षक संदीप राठोड, पोलीस हवालदार किशोर जाधव, राम भंडाणे, गणेश नांगरे, पोलीस कॉन्स्टेबल महेश चव्हाण, महादेव बहिरवाळ आणि होमगार्ड विजय साळवे यांच्या पथकाने केली असून पुढील तपास सुरू आहे.