अंबाजोगाई, प्रतिनिधी : मराठवाड्यात सातत्याने निर्माण होणारी दुष्काळी परिस्थिती आणि भूजल पातळीत होणारी घट लक्षात घेता पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरवून गावातील पाणीपातळी वाढविणे अत्यंत आवश्यक आहे. भविष्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली तरी गावाला आणि शेतीला पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी जलतारा अभियान काळाची गरज असल्याचे प्रतिपादन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कैलास बळवंत यांनी केले.
अंबाजोगाई तालुक्यातील नांदडी येथे गुरुवार, दि. २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत जलतारा अभियानाची जनजागृती करण्यात आली . यावेळी ते बोलत होते.
मराठवाडा हा सातत्याने दुष्काळाच्या झळा सोसणारा विभाग आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने जलतारा अभियान राबविण्यात येत आहे. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन आणि बीड जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांच्या मार्गदर्शनाखाली गटविकास अधिकारी कैलास बळवंत नांदडी गावात या अभियानांतर्गत १०० लाभार्थ्यांना जलतारा निर्मितीच्या कामासाठी मंजुरी देण्यात दिली आणि मार्गदर्शन करून जनजागृती करण्यात आली. एक एकर जमिनीमध्ये उत्तराच्या ठिकाणी पाणी साचते अशा ठिकाणी एक जलतारा पाच बाय पाच फूट आकाराचे आणि सहा फूट खोलीचे खड्डे घेऊन त्यामध्ये खडी व इतर पाणी मुरविणारे साहित्य भरले जाणार आहे. यामुळे पावसाचे पाणी थेट जमिनीत मुरण्यास मदत होऊन भूजल पातळीत वाढ होण्यास हातभार लागणार आहे.
पुढे बोलताना कैलास बळवंत म्हणाले की, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दरवर्षी दुष्काळाच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. गावांसह वाड्या-वस्त्यांनाही पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. पावसाचा प्रत्येक थेंब योग्य पद्धतीने जमिनीत मुरविल्यास भविष्यात पाणीटंचाईचा प्रश्न कमी होण्यासोबतच शेतीच्या सिंचनाचा प्रश्नही मार्गी लागू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी जलतारा अभियानात सक्रिय सहभाग नोंदवून जलसंधारणाच्या या चळवळीत सहभागी व्हावे, नांदडी गावचा आदर्श घेऊन अंबाजोगाई तालुक्यातील इतर गावातील नागरिकांनी जलतारा अभियानात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत अधिकारी गावातील सर्व नागरिक उपस्थित होते
घरकुलची पाहणी
गावातील मंजूर असलेल्या घरकुलची चालू कामाची पाहणी करून पंचायत समिती गटविकास अधिकारी घरकुल विभागाचे अभियंता तसेच अकाउंटंट यांनी पाहणी केली. लाभार्थ्यांना मार्गदर्शन केले. यांचे घरकुलचे काम पूर्ण झाले आहे. अशा लाभार्थ्यांनी एक किलो वॅटचे सोलार बसून घ्यावेत. सोलार बसविनाऱ्या लाभार्थ्यांना तात्काळ 15000 अनुदान देण्यात येईल आणि ज्यांची घरकुलचे काम चालू आहे अशा सर्व लाभार्थ्यांना मार्चपर्यंत घरकुलचे हप्ते पूर्ण मिळतील असे सांगण्यात आले.
तसेच ज्या घरकुल लाभार्थ्यांची घरकुलांची कामे पूर्ण झाली आहेत, अशा लाभार्थ्यांना पंचायत समितीच्या वतीने त्यांच्या नावाची घरकुल पाटी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
श्रमदान करणाऱ्या महिलांना लकी ड्रॉद्वारे गृहपयोगी वस्तू
नांदडी ग्रामपंचायतीच्या वतीने गावात स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत श्रमदानासाठी सहभागी होणाऱ्या महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी ग्रामपंचायतीने अभिनव उपक्रम सुरू केला आहे. दर आठवड्याला लकी ड्रॉ काढून सहभागी महिलांना गृहपयोगी वस्तू भेट देण्यात येणार आहेत. स्वच्छतेच्या कामात महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी सुरू केलेल्या या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.
नांदडीत पती-पत्नीच्या संयुक्त नावावर होणार घराची नोंद
महिलांना मालमत्तेमध्ये समान अधिकार मिळावा, या उद्देशाने नांदडी ग्रामपंचायतीने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पतीच्या एकट्याच्या नावावर असलेली राहत्या घराची जागा आता पती-पत्नी या दोघांच्या संयुक्त नावावर करण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यामुळे कुटुंबातील महिलांना मालमत्तेच्या अधिकारात स्थान मिळणार आहे.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!