केज, दि. २७ : केज तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती, संभाव्य पाणीटंचाई, जनावरांचा चारा आणि रखडलेले दुष्काळ अनुदान या महत्त्वाच्या प्रश्नांवर केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिताताई मुंदडा यांनी शुक्रवारी (दि. २७) येथील तहसील कार्यालयात तालुकास्तरीय अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेतली. नागरिकांना पिण्याच्या पाण्याची व शेतकऱ्यांना चारा टंचाईची झळ बसू नये, यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात आणि प्रलंबित अनुदानाचे वाटप त्वरित मार्गी लावावे, अशा स्पष्ट सूचना त्यांनी यावेळी यंत्रणेला दिल्या.

या आढावा बैठकीस ज्येष्ठ नेते नंदकुमार मुंदडा यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रशासनाच्या वतीने तहसीलदार नितीन गर्जे, नायब तहसीलदार फुलचंद हंगे, गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक तसेच महसूल, कृषी, पंचायत समिती आणि पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यासोबतच भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्तेही मोठ्या संख्येने या बैठकीला हजर होते.

पाणी, चारा आणि दुष्काळ अनुदानावर सविस्तर मंथन

बैठकीत आमदार नमिता मुंदडा यांनी तालुक्यातील गावनिहाय परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. ज्या गावांमध्ये आणि वाड्या-वस्त्यांवर पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत आहे, तेथे टँकर सुरू करणे, विंधन विहिरींची दुरुस्ती करणे व पाणीपुरवठा योजना सुरळीत ठेवण्याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले. तसेच, पशुधनासाठी आवश्यक असणाऱ्या चाऱ्याची उपलब्धता आणि आगामी काळातील नियोजनाचाही आढावा घेण्यात आला.

शासनाकडून जाहीर झालेले दुष्काळ अनुदान आणि पीकविमा मदतीपासून कोणताही पात्र शेतकरी वंचित राहू नये, तांत्रिक अडचणी दूर करून शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ रक्कम जमा करावी, अशी तंबीही त्यांनी संबंधित विभागांना दिली. तालुक्यातील जनतेला दिलासा देण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन आमदार मुंदडा यांनी यावेळी केले.