अंबाजोगाई, दि. २७ : विद्यार्थ्यांनी बारावी उत्तीर्ण होईपर्यंत मोबाईलच्या आहारी न जाता आपल्या हाताला कला आणि अवयवांना काम दिले पाहिजे; हाताला दिलेली कला तुम्हाला नक्कीच जगवेल, असे मोलाचे मार्गदर्शन प्रख्यात चित्रकार अमृतराव टेकाळे यांनी केले. येथील ४२ व्या 'यशवंतराव स्मृती समारोहाच्या' समारोप दिनी शुक्रवारी (दि. २७) सकाळी आयोजित शालेय रंगभरण व चित्रकला स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. यावेळी मंचावर समारोहाचे सचिव दगडू लोमटे, उपाध्यक्ष प्राचार्य कमलाकर कांबळे, चित्रकार त्र्यंबकआप्पा पोखरकर तसेच परीक्षक सचिन भोकरे, संभाजी देशमुख आणि हरिदास आपेट उपस्थित होते.

पी. टी. उषा, सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांनी आपापल्या कौशल्याला परिश्रम दिले म्हणून ते जगज्जेते ठरले, असे सांगत टेकाळे गुरुजींनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. स्व. भगवानराव लोमटे आणि भगवानबप्पा शिंदे यांनी ४२ वर्षांपूर्वी लावलेल्या या रोपट्याचे दगडू लोमटे यांनी वटवृक्षात रूपांतर केले असून ते भारत जोडो अभियानातून राष्ट्रजोडणीचे कार्य करत असल्याबद्दल त्यांनी गौरवोद्गार काढले. प्रास्ताविकात दगडू लोमटे यांनी टेकाळे गुरुजींनी रेखाटलेले चित्र समितीने तब्बल २२ वर्षे वापरल्याची माहिती दिली.

स्पर्धेचा निकाल आणि बक्षीस वितरण

या स्पर्धेत शहरातील १८ शाळांमधील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. प्राथमिक गटात (५ वी ते ७ वी) विधी मधुकर राठोड (स्वामी विवेकानंद बालक मंदिर) हिने प्रथम, आरोही अशोक धायगुडे (येलडा) हिने द्वितीय, तर आरुष दत्तात्रय खंडागळे (प्रमोद महाजन न्यू इंग्लिश स्कूल) याने तृतीय क्रमांक पटकावला; पूनम चामनर व दर्शना ढोले यांना उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले. माध्यमिक गटात (८ वी ते १० वी) तनिशा महेश रोकडे (योगेश्वरी कन्या शाळा) हिने प्रथम, अनुष्का बालासाहेब तट हिने द्वितीय, तर प्रगती सुरेश वाघ (खोलेश्वर विद्यालय) हिने तृतीय क्रमांक मिळवला; सौमित्र रामदासी आणि पार्थ सवणे उत्तेजनार्थ ठरले. विजेत्यांना अनुक्रमे एक हजार, सातशे, पाचशे व उत्तेजनार्थ दोनशे रुपये देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन कन्नडकर यांनी केले, तर नामदेव मोरे व बालासाहेब साखरे यांनी आभार मानले.