माजलगाव : तालुक्यातील टाकरवन येथील डॉ. मतीन गणी पटेल यांची जपानमधील प्रतिष्ठित शिन्शू विद्यापीठात आंतरराष्ट्रीय संशोधनासाठी निवड झाली आहे. आधुनिक ऊर्जा साठवणूक तंत्रज्ञानात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या पोटॅशियम-आयन बॅटरीवर ते सखोल संशोधन करणार असून, त्यांच्या या यशामुळे बीड जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्राचा गौरव वाढला आहे.
सध्या मोबाईल, लॅपटॉप आणि इलेक्ट्रिक वाहनांमध्ये लिथियम-आयन बॅटरीचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. मात्र, या बॅटरीला अधिक स्वस्त, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक पर्याय म्हणून पोटॅशियम-आयन बॅटरी तंत्रज्ञानाकडे पाहिले जात आहे. डॉ. पटेल यांच्या संशोधनातून भविष्यात इलेक्ट्रिक वाहने आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांसाठी नवे पर्याय उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.
जपान सरकारच्या 'इंडिया-जपान सर्क्युलेशन ऑफ टॅलेंटेड युथ्स इन सायन्स' या विशेष उपक्रमांतर्गत त्यांची ही निवड झाली आहे. या कालावधीत त्यांना जपान सरकारकडून विद्यावेतन आणि संशोधनासाठी स्वतंत्र निधी मिळणार आहे. छत्रपती संभाजीनगर येथे उच्च शिक्षण पूर्ण करून त्यांनी हा टप्पा गाठला असून, माजी सरपंच वसीम पटेल यांच्यासह संपूर्ण जिल्ह्यातून त्यांचे अभिनंदन होत आहे.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!