केज, दि. २७ : मालक आणि त्याच्या भावाच्या सततच्या छळाला कंटाळून आत्महत्या केलेल्या सिद्धनाक रवी सिरसट (वय १८, रा. टाकळी, ता. केज) या तरुणाच्या प्रकरणातील दोषींना तात्काळ अटक करावी, या मागणीसाठी संतप्त नातेवाईक व दलित चळवळीतील कार्यकर्त्यांनी शुक्रवारी त्याचा मृतदेह थेट केज पोलिस ठाण्यात आणला. यामुळे ठाणे परिसरात काही काळ मोठा तणाव निर्माण झाला होता. सहाय्यक पोलिस अधीक्षक वेंकटराम यांनी फरार आरोपींच्या शोधासाठी तीन पथके रवाना केल्याचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि मृत्यूनंतर तब्बल २८ तासांनी टाकळी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
केज येथील अखिल खलील खतीब यांच्याकडे सिद्धनाक जनावरे सांभाळण्याचे काम करत होता. कुटुंबीयांचा विरोध असतानाही अखिल खतीब पैशांचे आमिष दाखवून त्याच्याकडून बळजबरीने काम करून घेत असे व मोबदलाही देत नव्हता. तसेच त्याचा भाऊ मुस्तकिन खलील खतीब हादेखील सिद्धनाकला म्हशी धुणे, गोठा साफ करणे अशी कामे जबरदस्तीने करायला लावून छळ करत होता. या जाचाला कंटाळून सिद्धनाकने २६ नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषद शाळेमागील खतीब यांच्या पत्र्याच्या शेडमधील लोखंडी अँगलला गळफास घेऊन जीवन संपवले.
ॲट्रॉसिटीसह आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा
सुरुवातीला या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद होणार असल्याची माहिती मिळताच कुटुंबीय व कार्यकर्त्यांनी गुन्हा दाखल होईपर्यंत शवविच्छेदन करण्यास नकार दिला. अखेर वडील रवी सिरसट यांच्या तक्रारीवरून केज पोलिसांनी अखिल खतीब आणि मुस्तकिन खतीब या दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०८ व ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत (गु. र. नं. ७३२/२०२६) गुन्हा नोंदवला. इन-कॅमेरा शवविच्छेदनानंतर मृतदेह ठाण्यात आणला गेला होता; मात्र पोलिसांच्या ठोस आश्वासनानंतर तणाव निवळला आणि आई राणी, वडील रवी व नातेवाईकांच्या हृदयद्रावक आक्रोशात सिद्धनाकवर अंत्यसंस्कार पार पडले.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!