केज: केज तालुक्यातील युसुफवडगाव पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या डिघोळआंबा शिवारात एका अनोळखी व्यक्तीचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेचा पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने अज्ञात मारेकऱ्यांनी मृतदेह जाळून टाकण्याचा प्रयत्न केल्याचेही समोर आले आहे.
बुधवार, दिनांक २५ नोव्हेंबर रोजी डिघोळआंबा शिवारातील कानडी बदनकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या एका जुन्या तलावात हा मृतदेह स्थानिकांना आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच युसुफवडगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मांजरमे आणि पोलीस कॉन्स्टेबल धनंजय कारले यांनी सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. अज्ञात हल्लेखोरांनी या व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून हत्या केल्यानंतर ओळख पटू नये म्हणून प्रेत पेटवून देण्याचा प्रयत्न केला, मात्र ते अर्धवट अवस्थेत जळाले आहे.
मृतदेहाची ओळख पटविण्याचे पोलिसांचे आवाहन
घटनास्थळी आढळलेला मृतदेह हा ५० ते ५५ वर्षे वयोगटातील पुरुषाचा आहे. मयताच्या अंगात पांढऱ्या रंगाचा फाटलेला व अर्धवट जळालेला सदरा असून, करड्या रंगाची काळे-पिवळे पट्टे आणि लाल कापडाचे ठिगळ असलेली चड्डी आहे. कमरेला लाल रंगाचा करदोडा असून, त्यास काळ्या, पांढऱ्या व पोपटी रंगाच्या दोऱ्याने तीन चाव्या बांधलेल्या आहेत. मृतदेहाजवळ काळ्या रंगाच्या चामड्याच्या चपलांचा जोड (जोडे) आणि एका लाल चौकडीच्या रुमालात बांधलेले डेटॉल व मेडिमिक्स साबण आढळून आले आहेत.
या वर्णनाच्या इसमाची ओळख पटविण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मांजरमे यांनी केले आहे. या संदर्भात कोणतीही माहिती मिळाल्यास युसुफवडगाव पोलिसांशी ९७३०९३४४१४ किंवा ९२२५०९२८३७ या क्रमांकावर तात्काळ संपर्क साधावा, असे पोलिसांनी कळवले आहे.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!