माजलगाव: हिवरा ते माजलगाव रस्त्यावर वंजारवस्तीजवळ दोन दुचाकींवरून आलेल्या चार अनोळखी व्यक्तींनी एका सराफाची मोटारसायकल अडवून १ लाख ५५ हजार रुपयांचे चांदीचे दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या या जबरी चोरीमुळे परिसरात खळबळ उडाली असून, याप्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात चार अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाघोरा (ता. माजलगाव) येथील रहिवासी असलेले सराफ व्यावसायिक बालाजी अर्जुन डाके (वय २८) यांनी याबाबत पोलिसांत फिर्याद दिली आहे. २३ नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास बालाजी डाके हे आपल्या वडिलांसोबत दुचाकीवरून (एमएच २० एफएफ ०५६१) गव्हाणथडी येथून माजलगावकडे परत येत होते. हिवरा ते माजलगाव मार्गावरील वंजारवस्तीजवळ आले असता, चार अनोळखी इसमांनी त्यांच्या दोन दुचाकी बालाजी यांच्या गाडीला आडव्या लावल्या. त्यानंतर आरोपींनी बालाजी यांच्या वडिलांच्या हातातील चांदीचे दागिने असलेली बॅग हिसकावून घेतली. या बॅगेमध्ये एक किलो वजनाची चांदीची चैन आणि गळ्यातील चांदीचे लॉकेट असा एकूण १ लाख ५५ हजार रुपयांचा ऐवज होता. यावेळी त्यापैकी एका आरोपीने बालाजी यांना ढकलून दिल्याने त्यांच्या उजव्या खांद्याला खरचटले आहे.
या घटनेनंतर बालाजी डाके यांनी २३ नोव्हेंबर रोजी रात्री माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी चार अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०९ (४), ११५ (२) आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अंभोरे करत आहेत.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!