अंबाजोगाई, दि. २७ : मराठवाड्यातील सातत्यपूर्ण दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी आणि शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरविणारे 'जलतारा' अभियान ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कैलास बळवंत यांनी केले. संविधान दिनाचे औचित्य साधून गुरुवारी (दि. २६) अंबाजोगाई तालुक्यातील नांदडी येथे 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत' आयोजित जलतारा जनजागृती कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांच्या मार्गदर्शनाखाली नांदडीतील १०० लाभार्थ्यांना जलतारा कामांची मंजुरी देण्यात आली असून, एक एकर शेतीच्या उतारावर पाच बाय पाच फूट रुंद व सहा फूट खोल खड्डे घेऊन खडीद्वारे पाणी मुरविले जाणार आहे.

घरकुल पाहणी व सौरऊर्जा अनुदानाची माहिती

या दौऱ्यात गटविकास अधिकारी कैलास बळवंत, अभियंता व लेखापाल यांनी गावातील मंजूर घरकुल कामांची पाहणी केली. मार्चअखेरपर्यंत अपूर्ण घरकुलांचे सर्व हप्ते वितरित केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, घरकुल पूर्ण झालेल्या लाभार्थ्यांना पंचायत समितीमार्फत नावाची पाटी दिली जाणार असून, त्यांनी एक किलोवॅट क्षमतेचे सौरऊर्जा संच बसविल्यास तात्काळ १५ हजार रुपयांचे अनुदान दिले जाईल, असे मार्गदर्शनही यावेळी करण्यात आले.

ग्रामपंचायतीचे महिला सन्मानाचे अभिनव उपक्रम

नांदडी ग्रामपंचायतीने गावच्या स्वच्छता मोहिमेत श्रमदान करणाऱ्या महिलांना प्रोत्साहित करण्यासाठी दर आठवड्याला लकी ड्रॉद्वारे गृहपयोगी वस्तू भेट देण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. याशिवाय, महिलांना मालमत्तेत समान हक्क मिळावा या उद्देशाने पतीच्या एकट्याच्या नावावर असलेल्या राहत्या घराची नोंद आता पती-पत्नीच्या संयुक्त नावावर करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय ग्रामपंचायतीने घेतला आहे. या कार्यक्रमाला सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत अधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.