किल्ले धारूर, दि. २७ : एकल महिलांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आणि त्यांची कार्यालयीन धावपळ थांबवण्यासाठी धारूर तालुका वात्सल्य समितीच्या वतीने आयोजित एकल महिला मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तहसीलदार तथा समितीचे अध्यक्ष श्रीकांत निळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या अभिनव उपक्रमात तालुक्यातील २०० हून अधिक महिलांचे विविध विभागांशी संबंधित प्रलंबित प्रश्न एकाच ठिकाणी मार्गी लावण्यात आले.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेच्या पूजनाने मेळाव्याचे उद्घाटन झाले. यावेळी गटविकास अधिकारी शेषराव कांदे, तालुका कृषी अधिकारी जनार्दन भगत, नायब तहसीलदार प्रकाश गोपड, एन. एस. काकडे तसेच समिती सदस्य अनिल महाजन, सय्यद शाकेर आणि निकिता तिडके यांची प्रमुख उपस्थिती होती. या मेळाव्यात स्वस्त धान्य पुरवठ्याचे ७०, संजय गांधी निराधार योजनेचे ६५, बालसंगोपन योजनेचे ३५ आणि घरकुल योजनेशी संबंधित २२ महिलांचे प्रश्न जागेवरच निकाली काढण्यात आले.
प्रशासनाच्या अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक
एकल महिलांनी आपल्या समस्या निर्भीडपणे मांडून शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार श्रीकांत निळे यांनी केले. मान्यवरांच्या मार्गदर्शनानंतर ॲड. मोहन भोसले यांनी सूत्रसंचालन केले. मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी विस्तार अधिकारी के. जे. कुलकर्णी, किरण नेरकर, प्रदीप राठोड, एस. व्ही. जाधव, संरक्षण अधिकारी अमोल डोंगरे व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. एकाच छत्राखाली महिलांचे प्रश्न सोडवण्याच्या या उपक्रमाचे तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!