बीड : केवळ शालेय गुणांवर प्रगती अवलंबून नसून स्पर्धेतील सादरीकरण महत्त्वाचे असते; त्यामुळे युवकांनी जाती-धर्माच्या भिंती बाजूला सारून सामाजिक दायित्वाच्या भावनेतून बीड जिल्ह्याच्या विकासात योगदान द्यावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी केले. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व तुलसी शैक्षणिक समूह यांच्या संयुक्त विद्यमाने येथील तुलसी महाविद्यालयात शुक्रवारी आयोजित 'जिल्हास्तरीय युवा महोत्सव २०२६-२७' च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
युवकांना योग्य दिशा दाखविण्याची आज नितांत गरज असल्याचे नमूद करत जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, व्यस्त जीवनशैलीतून वेळ काढून मी स्वतः नियमित खेळ खेळतो आणि जलसंधारण व क्रीडा विभागाच्या उपक्रमांना नेहमीच प्राधान्य देतो. बीडच्या तरुणांनी आपले कौशल्य सिद्ध करून विभाग आणि राज्यस्तरावर जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमाला तुलसी शैक्षणिक समूहाचे अध्यक्ष प्रा. प्रदीप रोडे, जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर, जिल्हा युवा अधिकारी सागर उज्जैनकर, प्राचार्य डी. जी. निकाळजे, डॉ. कविता गित्ते आणि श्रीमती क्षितीजा गव्हाणे आदी मान्यवर उपस्थित होते.
राष्ट्रीय पातळीवरील कलाकारांचा गौरव
छत्तीसगडमधील रायपूर येथे पार पडलेल्या 'वंदे मातरम' राष्ट्रीय कार्यक्रमात बीडचे प्रतिनिधित्व करणाऱ्या युवकांचा यावेळी सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. महोत्सवात कु. अंकिता जाधव, कु. गौरी घुले यांच्या बहारदार लावणीने आणि इन्फिनिटी डान्स ग्रुपच्या नृत्याने उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अरविंद विद्यागर यांनी केले, तर सागर उज्जैनकर यांनी आभार मानले.












प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!