अंबाजोगाई: केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश आले असून, अंबाजोगाईतील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (स्वाराती) सुसज्ज क्रीडा संकुल इमारतीच्या बांधकामास राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाने २५ नोव्हेंबर रोजी यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला असून, या कामासाठी तब्बल १३ कोटी ६२ लाख ३० हजार ७७८ रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
१८२२ चौरस मीटरवर उभारणार अद्ययावत सुविधा
हे प्रस्तावित क्रीडा संकुल १८२२ चौरस मीटर क्षेत्रफळावर उभारले जाणार असून, त्यात टेनिस कोर्ट, बॅडमिंटन कोर्ट, स्क्वॅश कोर्ट, बास्केटबॉल कोर्ट, क्रिकेट नेट, इनडोअर गेम्स, उपाहारगृह, आच्छादित मंडप आणि कार्यालयाच्या खोल्यांचा समावेश असेल. यासोबतच मैदानाचा विकास, स्टेडियमच्या पायऱ्या, रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि दिव्यांगांसाठी विशेष रॅम्प अशा अद्ययावत सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत.
माजी आरोग्यमंत्री स्व. डॉ. विमलताई मुंदडा यांचे वैद्यकीय शिक्षण याच महाविद्यालयात पूर्ण झाल्याने त्यांना स्वारातीबद्दल विशेष आत्मीयता होती. त्यांचाच वारसा पुढे नेत त्यांच्या स्नुषा आमदार नमिता मुंदडा यांनी रुग्णालय विकासावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. त्यांच्या प्रयत्नातून अकराशे कोटींचा मास्टर प्लॅन आकारास येत आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमाचा विद्यार्थ्यांवरील ताण लक्षात घेऊन त्यांना विरंगुळा आणि खेळाच्या आवडी जोपासता याव्यात, यासाठी आमदार मुंदडा यांनी क्रीडा संकुलासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता, ज्याला आता यश आले आहे.
या महत्वपूर्ण बाबीसाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ आणि मंत्री पंकजाताई मुंडे यांचे आमदार नमिता मुंदडा यांनी आभार मानले आहेत.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!