मुंबई (प्रतिनिधी): ग्रामीण भागातील युवकांना स्वयंरोजगारापुरते मर्यादित न ठेवता पशुधन क्षेत्रातील उद्योजक घडविण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजने’चे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह येथे लोकार्पण करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे, मंत्री ॲड. आशिष शेलार आणि मुख्य सचिव राजेश अग्रवाल उपस्थित होते.

या योजनेंतर्गत दूध, अंडी, कुक्कुटपालन, मांस उत्पादन आणि वराहपालन व्यवसायांचे समूह विकसित केले जाणार आहेत. यामध्ये सर्वसाधारण लाभार्थ्यांना ५० टक्के, तर महिला आणि अनुसूचित जाती-जमातीतील लाभार्थ्यांना ७५ टक्के अनुदान मिळणार आहे. अर्जापासून लाभ वितरणापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक व ऑनलाइन असून त्यासाठी फार्मर आयडीऐवजी 'महाआयडी' आवश्यक असेल. ही योजना ग्रामीण महाराष्ट्राचा चेहरा बदलणारी ठरेल, असा विश्वास मंत्री पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केला, तर उत्कृष्ट कामाबद्दल मुख्यमंत्र्यांनी पशुसंवर्धन विभागाचे अभिनंदन केले.