परळी तालुक्यातील मलनाथपूर येथे नवरात्रोत्सवाच्या दरम्यान देवीच्या मंदिरावरील लाऊडस्पीकरचा आवाज वाढवल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका भाविकाला चौघांनी लाकडी काठी आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. १२ ऑक्टोबर रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली असून सिरसाळा पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मलनाथपूर येथील देवीच्या मंदिराजवळ भाविकांची उपस्थिती असताना लाऊडस्पीकरच्या आवाजावरून प्रशांत हरिभाऊ सलगर आणि गावातील इतर तरुणांमध्ये वाद झाला. 'लाऊडस्पीकरचा आवाज का वाढवला' असा जाब विचारत आरोपी हनुमंत नागोराव सलगर, प्रशांत हनुमंत सलगर, नागनाथ हनुमंत सलगर आणि महेश लक्ष्मण सलगर यांनी प्रशांत यांना अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आरोपींनी हातातील काठीने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करून प्रशांत यांना जखमी केले व जीवे मारण्याची धमकी दिली. या हल्ल्यानंतर प्रशांत सलगर यांनी सिरसाळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलीस अंमलदार मुंडे पुढील तपास करत आहेत.