माजलगाव: मुंबईच्या जिल्हाधिकाऱ्यांचा अपघात झाल्याची खोटी माहिती देऊन माजलगाव येथील उपविभागीय कार्यालयातील एका अधिकाऱ्याला तीस हजार रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सायबर भामट्याविरुद्ध माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गौरव साहेबराव इंगोले (वय ३५, रा. भाटवडगाव, माजलगाव) हे येथील उपविभागीय कार्यालयात कार्यरत आहेत. त्यांना रविवारी दुपारी एका अज्ञाताने फोन करून आपण धनंजय मुंडे यांचे स्वीय सहाय्यक जोशी बोलत असल्याचे भासवले. मुंबईचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या गाडीचा वडवणीजवळ अपघात झाला असून, त्यांच्या मुलाला गंभीर दुखापत झाली आहे, अशी खोटी माहिती कॉलरने दिली. तसेच, रुग्णालयात नेण्यासाठी तातडीने पैशांची मागणी करत एक स्कॅनर पाठवले.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन गौरव इंगोले यांनी आपला भाऊ अमित पाईकराव याच्या बँक खात्यावरून दिलेल्या स्कॅनरवर दोन टप्प्यांत तीस हजार रुपये पाठवले. मात्र, नंतर बीडचे जिल्हाधिकारी विवेक यांच्याशी संपर्क साधून खात्री केली असता, असा कोणताही अपघात झाला नसल्याचे आणि फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
या प्रकरणी गौरव इंगोले यांच्या फिर्यादीवरून माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीवर भारतीय न्याय संहितेच्या फसवणुकीच्या कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रवींद्र अंभोरे हे करत आहेत. सायबर पोलिसांच्या मदतीने आता या भामट्याचा तांत्रिक तपास सुरू करण्यात आला आहे.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!