केज : बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी केज तालुक्यातील कानडी बदन येथे 'जय किसान आत्मा' शेतकरी गटातील शेतकरी आणि बचत गटाच्या महिलांसोबत शेतात जमिनीवर बसून भाजी-भाकरी व ठेचा खात दिवाळी साजरी केली. यावेळी शेतकऱ्यांना दिवाळी फराळ किटचे वाटप करण्यात आले. दुष्काळसदृश परिस्थिती, खरीप पिकांचे उत्पादन आणि शेतकऱ्यांसमोरील अडचणींवर जिल्हाधिकाऱ्यांनी थेट संवाद साधून मार्गदर्शन केले. संकटकाळात प्रशासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याची ग्वाही त्यांनी या वेळी दिली.

या भेटीदरम्यान उपविभागीय अधिकारी दीपक वजाळे, तहसीलदार अशोक भंडारे, मंडळ कृषी अधिकारी प्रशांत वाघमारे, कृषी सहाय्यक भाग्यश्री पतंगे यांच्यासह कृषी व महसूल विभागाचे अधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते.

स्मार्ट प्रकल्प व शेती प्रयोगांची पाहणी :

  • आंतरपीक व आधुनिक तंत्रज्ञान : युसुफ वडगाव येथील एस. एस. के. ॲग्रो प्रोड्युसर कंपनीला भेट देऊन जिल्हाधिकाऱ्यांनी स्मार्ट प्रकल्पांतर्गत उपक्रमांची माहिती घेतली. शेतकरी शिवराज खरबड यांच्या शेतात ठिबक सिंचन, सेंद्रिय निविष्ठा व टोकण पद्धतीने घेतलेल्या तूर आणि सोयाबीन आंतरपिकाची पाहणी केली.

  • सेंद्रिय शेती व जीवामृत : गोमूत्र, गूळ व डाळीच्या पिठापासून पिकांसाठी टॉनिक म्हणून तयार केल्या जाणाऱ्या 'जीवामृत' निर्मिती प्रकल्पाची पाहणी करून त्याच्या उपयुक्ततेबाबत माहिती घेतली.

  • पौष्टिक तृणधान्ये : टोकण पद्धतीने लागवड केलेल्या ज्वारी पिकाची पाहणी करताना आहारातील पौष्टिक तृणधान्यांचे महत्त्व स्पष्ट करत शेतकऱ्यांना अशा पिकांच्या लागवडीस प्रोत्साहन दिले.