अंबाजोगाई : कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असताना प्रत्येकाने सामाजिक दायित्व जोपासणे गरजेचे आहे. महिलांनी बचत गटांच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या साक्षर व आत्मनिर्भर व्हावे, तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी कोणताही न्यूनगंड न बाळगता शिक्षणात पुढे यावे, असे आवाहन बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी केले. शिक्षणाच्या बळावरच ऊसतोड कामगारांची पिढी बदलणे शक्य असल्याचेही त्यांनी यावेळी अधोरेखित केले.
येथील संत गाडगेबाबा सेवाभावी संस्थेच्या ‘आधार माणुसकीचा’ या उपक्रमांतर्गत शनिवारी बीडसह इतर जिल्ह्यांतील ११०० गरीब व गरजू कुटुंबांना दिवाळीचा फराळ आणि माहेरची साडी वाटप करण्यात आली. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी बोलत होते. योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर बर्दापूरकर हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
माणूस जोडल्यास देश जोडला जाईल : चंद्रशेखर बर्दापूरकर
अध्यक्षीय भाषणात चंद्रशेखर बर्दापूरकर यांनी उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की, माणूस जोडला की देश आपोआप जोडला जातो. ॲड. संतोष पवार गेल्या दहा वर्षांपासून या उपक्रमाच्या माध्यमातून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांतील महिला आणि वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून भक्कम आधार देत आहेत.
याप्रसंगी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उपप्रादेशिक अधिकारी सिंधू कापरे, डॉ. निहारीका नागरगोजे, प्रा. रोहिणी पाठक, आदर्श शिक्षिका शीतल बोधले, शोभा खडकभावी, अर्चना सोळंके, रजनी देशमुख, रूपाली काकडे, मोनिका मुंदडा, स्वाती मोदी आणि ‘आधार माणुसकीचा’चे अध्यक्ष ॲड. संतोष पवार यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड. संतोष पवार यांनी केले, तर उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी मराठवाडा मित्र मंडळ पुणे, विद्यार्थी विकास योजना ठाणे आणि आधार माणुसकीच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!