बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील देवळाली पानाची शिवारात शनिवारी सकाळी चारा आणण्यासाठी गेलेल्या तरुण शेतकऱ्याची शिकार करणारा हिंस्र प्राणी बिबट्या नसून, तो पट्टेदार वाघच असल्याचे वनविभागाने अधिकृतरीत्या स्पष्ट केले आहे. या भयंकर घटनेत देवीदास ऊर्फ पिंटू माणिक टकले (वय ३८) या शेतकऱ्याचा वाघाच्या जीवघेण्या हल्ल्यात अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
देवीदास हे शनिवारी सकाळी जनावरांसाठी हिरवा चारा आणण्यासाठी घरापासून जवळच असलेल्या सोनीपठार डोंगरावर गेले होते. यावेळी दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर मागून अचानक झडप घातली आणि त्यांना तब्बल ५०० मीटर दूर काटेरी झुडपात फरफटत नेले. वडिलांनी कापलेले गवत आणण्यासाठी जेव्हा त्यांचा मुलगा डोंगरावर गेला, तेव्हा त्याला मातीवर रक्ताचे मोठे ओघळ दिसले. घाबरलेल्या मुलाने तातडीने गावकऱ्यांना बोलावले. लोकांचा मोठा जमाव आणि आरडाओरडा ऐकून वाघाने मृतदेह तिथेच टाकून जंगलात धूम ठोकली. मात्र, तोपर्यंत देवीदास यांचा जागीच तडफडून मृत्यू झाला होता.
आष्टीचे वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल मुंडे यांनी पाऊलखुणांची वैज्ञानिक तपासणी करून हा हल्ला वाघानेच केल्यावर शिक्कामोर्तब केले आहे. ऐन सणासुदीत कुटुंबाचा मुख्य आधार हिरावला गेल्याने गावात मोठी शोककळा पसरली असून, या नरभक्षक वाघाला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने तातडीने पिंजरा लावावा, अशी संतप्त मागणी भयभीत ग्रामस्थांनी केली आहे.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!