धारूर तालुक्यातील आंबेवडगाव आणि परिसरातील गंभीर दुष्काळी परिस्थिती, पिकांचे झालेले नुकसान तसेच पाणीटंचाईचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी शेताच्या बांधावर जाऊन पाहणी केली. पावसाच्या प्रदीर्घ ओढीमुळे खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक विवंचनेत सापडला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि प्रशासकीय यंत्रणेला कामात गतिमानता आणण्याचे कडक निर्देश दिले.
पारदर्शक पंचनामे आणि १०० टक्के पीक विम्याची ग्वाही
दौऱ्यादरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी आंबेवडगाव परिसरातील सोयाबीन, कापूस आणि तूर पिकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली. पावसाअभावी वाळून गेलेल्या पिकांची स्थिती पाहून त्यांनी कृषी व महसूल विभागाला ई-पीक पाहणी आणि सॅटेलाइट इमेजेसच्या आधारे अत्यंत पारदर्शक पद्धतीने तत्काळ पंचनामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले. कोणताही पात्र शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे सांगतानाच, यंदा पीक विमा भरलेल्या सर्व बाधित शेतकऱ्यांना १०० टक्के विमा मिळवून देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
पाणीटंचाई, रोजगार आणि अधिकाऱ्यांना मुख्यालय न सोडण्याचे आदेश
गावातील पाणी आणि चाऱ्याच्या समस्येवर चर्चा करताना तीव्र टंचाई असलेल्या भागात मागणीनुसार तातडीने टँकर सुरू करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच दुष्काळात मजुरांच्या हाताला काम मिळावे यासाठी जलसंधारण आणि रोहयोची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. दुष्काळ निवारणाच्या कामात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा देत वैद्यकीय आणीबाणी वगळता कोणत्याही अधिकाऱ्याला पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही व रजा मंजूर केली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. या पाहणी दौऱ्यावेळी तहसीलदार श्रीकांत निळे, कृषी सहायक श्रीनिवास कंडिल, महसूल अधिकारी डी. के. शेजाळ, सरपंच उत्तरेश्वर घोळवे, पोलीस पाटील गोविंद शिंदे, पत्रकार विठ्ठल वाघमोडे यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!