अंबाजोगाई: अंबाजोगाई शहरातील बन्सीलाल नगर भागात एका दुकानाबाहेर ठेवलेली वीस हजार रुपये किमतीची कटर मशीन चोरून रिक्षातून पळणाऱ्या दोन आरोपींना दुकानदाराने सहकाऱ्यांच्या मदतीने पाठलाग करून रंगेहाथ पकडले आहे. ही चोरीची घटना ३ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी घडली.

फिर्यादी कुशल अशोक अंबाड (वय ३२, मूळ रा. लाडेगाव, ता. केज, सध्या रा. पोखरी रोड, अंबाजोगाई) यांचे बन्सीलाल नगर येथे 'अंबाड ट्रेडर्स' नावाचे दुकान आहे. ३ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास दुकानाबाहेर ठेवलेली वीस हजार रुपये किमतीची 'डिवॉल्ट' कंपनीची ॲल्युमिनियम कटर मशीन एका व्यक्तीने उचलून समोर उभ्या असलेल्या रिक्षात (एमएच २२ यु ३४०७) टाकली. हा प्रकार लक्षात येताच कुशल अंबाड यांनी त्यांना थांबण्यास सांगितले. मात्र, आरोपी रिक्षा घेऊन पळू लागले. त्यानंतर कुशल अंबाड यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसोबत पाठलाग करून आरोपी हरीभाऊ शामराव देवकर आणि अरुण महादेव सरवदे (दोघे रा. गांधीनगर, अंबाजोगाई) यांना पकडले.

याप्रकरणी कुशल अंबाड यांच्या तक्रारीवरून अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार हनुमान मुंडे हे करीत आहेत.