किल्ले धारूर: पर्यावरण संवर्धन आणि निसर्गरक्षणाचा सामाजिक संदेश रुजविण्यासाठी ‘बी’ कंपनी १३६ इन्फंट्री बटालियन (टीए) इको, महार यांच्या वतीने ‘एक पेड माँ के नाम’ अभियानांतर्गत वृक्षारोपणाचा तिसरा टप्पा मोठ्या उत्साहात पार पडला. या विशेष मोहिमेत स्थानिक ज्ञानदीप प्राथमिक विद्यालय आणि आयटीआय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी जवानांच्या खांद्याला खांदा लावून सहभाग घेत आयटीआय महाविद्यालय परिसरात तब्बल ११ हजार वृक्षांची लागवड केली.
मातृप्रेमासोबतच पर्यावरण रक्षणाचा नवा संकल्प
या उपक्रमात ‘बी’ कंपनीचे कमांडर लेफ्टनंट कर्नल कीर्तिकुमार एन. दवे, सुबेदार विष्णू बढे, हवालदार राजेंद्र कदम, हवालदार दयानंद कदम यांच्यासह बटालियनचे सर्व जवान सक्रिय सहभागी झाले होते. ज्ञानदीप प्राथमिक विद्यालय व आयटीआय महाविद्यालयातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी सैनिकांसोबत प्रत्यक्ष खड्डे खोदून व रोपे लावून मोहिमेला मोठे बळ दिले. जवानांच्या शिस्तबद्ध मार्गदर्शनाखाली शालेय विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या उत्साहामुळे संपूर्ण परिसरात पर्यावरण संरक्षणाचे चैतन्यदायी वातावरण निर्माण झाले होते.
केवळ वृक्षारोपण नव्हे, तर संगोपन ही प्रत्येकाची जबाबदारी
वृक्षारोपणानंतर उपस्थितांशी संवाद साधताना लेफ्टनंट कर्नल कीर्तिकुमार एन. दवे यांनी पर्यावरणातील समतोल राखण्यासाठी वृक्षांचे अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित केले. केवळ झाडे लावून मोहीम पूर्ण होत नाही, तर त्या रोपांचे नियमित संगोपन आणि संवर्धन करणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे, असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. आईप्रती कृतज्ञता व्यक्त करतानाच निसर्गाप्रती बांधिलकी जपणारा हा उपक्रम तालुक्यात कौतुकाचा विषय ठरला आहे.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!