धारूर: तालुक्यातील आंबे वडगाव येथे महावितरणच्या मुख्य वीजवाहिन्यांमध्ये अचानक झालेल्या शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत शिवशंकर साहेबराव घोळवे या शेतकऱ्याचा दोन एकरांतील उभा ऊस जळून भस्मसात झाला. ऐन तोडणीच्या तोंडावर आलेले पीक डोळ्यांदेखत राख झाल्याने शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने घोळवे कुटुंब पूर्णपणे कोलमडून पडले आहे.

वाऱ्याच्या वेगामुळे आग क्षणार्धात पसरली

मिळालेल्या माहितीनुसार, आंबे वडगाव शिवारातील शेतातून गेलेल्या वीजवाहिन्यांमध्ये दुपारी एकच्या सुमारास अचानक तांत्रिक बिघाड होऊन जोरदार शॉर्टसर्किट झाले. तारांमधून पडलेल्या ठिणग्यांमुळे उसाच्या पाचटाने तात्काळ पेट घेतला. वाऱ्याचा वेग प्रचंड असल्याने आगीने काही मिनिटांतच रौद्ररूप धारण करून संपूर्ण दोन एकर फडाला कवेत घेतले. धुराचे लोट पाहून आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी आग विझवण्यासाठी धाव घेतली; मात्र आगीची तीव्रता इतकी मोठी होती की, नागरिकांचे प्रयत्न निष्फळ ठरले आणि संपूर्ण ऊस जळून खाक झाला.

ठिबक सिंचनासह साहित्याची राखरांगोळी; आर्थिक मदतीची मागणी

वर्षभर अतोनात कष्ट करून आणि कर्ज काढून शिवशंकर घोळवे यांनी उसाचे पीक उभे केले होते. मात्र, महावितरणच्या निष्काळजीपणामुळे पिकासह शेतातील ठिबक सिंचनाची पाईपलाईन व इतर शेतीउपयोगी साहित्य पूर्णपणे जळून नष्ट झाले. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून, महसूल विभागाने तातडीने घटनास्थळाचा पंचनामा करावा आणि महावितरणसह शासनाने पीडित शेतकऱ्याला विनाविलंब योग्य आर्थिक भरपाई द्यावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.