बीड जिल्ह्यातील धारूर शहरातील बसस्थानक परिसरात गप्पा मारताना स्वतःबद्दल बोलत असल्याच्या केवळ गैरसमजातून एका २१ वर्षीय तरुणावर १५ ते २० जणांच्या जमावाने प्राणघातक हल्ला केल्याची खळबळजनक घटना १९ सप्टेंबर रोजी रात्री उघडकीस आली आहे. याप्रकरणी चैतन्य अनिल अंधारे यांच्या फिर्यादीवरून ९ नामनिर्देशित व इतर १० ते १५ जणांवर धारूर पोलीस ठाण्यात २३ सप्टेंबर रोजी विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चैतन्य आणि त्याचा मित्र बसस्थानकासमोरील पानटपरीवर गप्पा मारत असताना आरोपी राहुल आतार याला ते आपल्याविषयीच बोलत असल्याचा संशय आला. यातून झालेल्या शाब्दिक वादानंतर आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवला. आकाश आतार याने लाकडी दांड्याने चैतन्यच्या डोक्यावर वार करून गंभीर जखमी केले, तर इतरांनी लोखंडी रॉड आणि चामडी पट्ट्याने अमानुष मारहाण केली. धक्कादायक बाब म्हणजे, संतोष गायकवाड या आरोपीने 'याला टिप्परखाली चिरडून टाकू, मी तुमच्या पाठीशी आहे' अशी प्रक्षोभक चिथावणी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या मारहाणीत फिर्यादी आणि त्यांच्या मित्राला लाथाबुक्क्यांनीही मारण्यात आले असून, या गंभीर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गिराम करत आहेत.