ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या जखमी रुग्णाच्या डोक्याला डॉक्टर उपस्थित असतानाही रुग्णालयातील शिपायाने टाके घेण्यास सुरुवात केल्याचा गंभीर प्रकार शुक्रवारी (दि. ९) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास समोर आला. दीपक परदेशी असे संबंधित शिपायाचे नाव असून, या प्रकारामुळे धारूर ग्रामीण रुग्णालयातील रुग्णसेवेचा गंभीर प्रश्न समोर आला आहे.

धारूर घाटामध्ये एका दुचाकीस्वाराचा अपघात झाला. या अपघातात तो जखमी झाला. शहरातील काही तरुणांनी तत्काळ त्याला उपचारासाठी धारूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. जखमीच्या डोक्याला दुखापत झाल्याने त्याच्यावर तातडीने उपचार करणे आवश्यक होते. यावेळी ग्रामीण रुग्णालयात आरोग्य अधिकारी डॉ. अनुश्री केंद्रे उपस्थित होत्या. मात्र, डॉक्टर उपस्थित असतानाही रुग्णालयात कार्यरत असलेल्या शिपाई दीपक परदेशी यांनी जखमीच्या डोक्याला टाके घेण्याची प्रक्रिया सुरू केल्याचे समोर आले. जखमेची साफसफाई करून त्यांनी सुईच्या साहाय्याने टाके घेण्यास सुरुवात केली. वैद्यकीय प्रशिक्षण आणि अधिकृत जबाबदारीचा प्रश्न असताना हा प्रकार घडल्याने रुग्णालयातील कामकाजाबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.