अंबाजोगाई (प्रतिनिधी) : यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहानिमित्त गुरुवारी (दि. २६ नोव्हेंबर) दुसऱ्या दिवसाच्या प्रथम सत्रात आयोजित 'बालआनंद मेळाव्यात' सुप्रसिद्ध बालकवी व कथाकार प्रभाकर साळेगांवकर यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. "आयुष्यात जे बनायचे ते बना, सगळ्यांचा आदर्श घ्या, पण स्वतःचे स्वत्व गमावू नका," असा मोलाचा संदेश देत निर्मळ मनातूनच प्रतिभावंत पिढी निर्माण होते, असे प्रतिपादन त्यांनी केले. व्यासपीठावर वेणूताई चव्हाण कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती कदम उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात साळेगांवकर यांनी 'करण्यास नवी क्रांती, वंदिली इथली माती' या संवेदनशील काव्यपंक्तींनी केली. संविधान दिनाचे औचित्य साधत त्यांनी आपल्या 'समृद्धीची चित्रकला' या कथेतील प्रसंगाद्वारे निसर्गचित्रात सूर्याच्या जागी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र रेखाटणाऱ्या विद्यार्थिनीचा दाखला देत महामानवाला अभिवादन केले. देशाचा विकास साधण्यासाठी मुलांचा, विशेषतः मुलींचा कणा ताठ राहिला पाहिजे, असे सांगत त्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या शालेय जीवनातील 'मला यशवंतराव चव्हाण बनायचे आहे' या उद्गारांची आठवण करून दिली.
मॅडम-सरपेक्षा 'गुरुजी आणि बाई' अधिक संवेदनशील
मेळाव्यात विद्यार्थिनी स्वरांजली व योगिता यांनी साळेगांवकर यांची प्रकट मुलाखत घेतली. शिक्षक-विद्यार्थी नात्यावर भाष्य करताना ते म्हणाले की, मॅडम आणि सरपेक्षा 'गुरुजी' आणि 'बाई' हे शब्द अधिक संवेदनशील असून 'बाबा-आई' या शब्दांतूनच 'बाई' हा शब्द तयार झाला आहे. ज्यांच्याभोवती मुले गराडा घालतात तेच खरे शिक्षक असतात. शिक्षकांनी आठवड्यातून एकदा विद्यार्थ्यांशी सहभोजन करावे, दर आठ दिवसाला वर्गातील बसण्याची जागा बदलावी आणि एक 'गप्पा दिवस' पाळावा, अशा सूचनाही त्यांनी केल्या.
वाचन आणि संवादातून व्यक्तिमत्त्व विकास
विद्यार्थ्यांनी 'श्यामची आई', 'हॅरी पॉटर' यांसारखे चित्रपट पाहावेत तसेच किरण बेदी आणि सिंधुताई सपकाळ यांची पुस्तके वाचावीत. आई, वडील, शिक्षक आणि समाज हे चार आरसे माणसाचे जगणे स्वच्छ व निर्मळ बनवतात, असे सांगत त्यांनी सुमारे दोन तास विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले. प्रारंभी ज्येष्ठ शिक्षिका अर्चना शर्मा यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला, तर मुख्याध्यापिका कदम यांनी प्रास्ताविकात बालमेळाव्याचे महत्त्व सांगितले.
या प्रसंगी साधना संस्थेच्या वतीने गोरख शेंद्रे यांनी वेणूताई चव्हाण माध्यमिक व प्राथमिक शाळेला ग्रंथ संच, तर रेखा देशमुख यांनी भारतीय संविधान भेट दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजश्री लोमटे यांनी केले आणि आभार किरणकुमार सोन्नर यांनी मानले. या वेळी स्मृती समारोहाचे सचिव दगडू लोमटे, कवी प्राचार्य मुकुंद राजपंखे, कवी गोरख शेंदरे व रेखा देशमुख उपस्थित होते.












प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!