केज : येथील एका पशुपालकाकडे सालगडी म्हणून कामाला असलेल्या १८ वर्षीय तरुणाने मालकाच्या घराशेजारील पत्र्याच्या शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सिद्धनाथ रवी शिरसाट असे मयत तरुणाचे नाव असून, त्याच्या पाठीवर मारहाणीचे व्रण दिसून येत असल्याने नातेवाईकांनी या मृत्यूबाबत गंभीर संशय व्यक्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, केज शहरातील पशुपालक अखिल खतीब यांच्याकडे जनावरांची चारा-पाणी आणि देखभाल करण्यासाठी सिद्धनाथ शिरसाट हा पंधरा दिवसांपूर्वीच सालगडी म्हणून कामाला राहिला होता. २६ ऑक्टोबर रोजी त्याने मालकाच्या घराशेजारी असलेल्या पत्र्याच्या शेडमधील लोखंडी अँगलला जनावरांच्या म्होरकीने गळफास घेऊन आत्महत्या केली. दुपारी १२:१५ वाजण्याच्या सुमारास मयताच्या नातेवाईकांना या घटनेची माहिती देण्यात आली. या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नसून, शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झाल्यावर पुढील गुन्हा नोंदविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मारहाण करून जीवे मारल्याचा नातेवाईकांचा संशय

मयत सिद्धनाथ शिरसाट याच्या पाठीवर चामड्याचा बेल्ट किंवा तत्सम वस्तूने मारहाण केल्याचे स्पष्ट व्रण दिसून येत आहेत. त्यामुळे मृत्यूपूर्वी त्याला बेदम मारहाण करून जीवे मारून गळफास देण्यात आला असावा किंवा शारीरिक छळ व मारहाणीला कंटाळून त्याने टोकाचे पाऊल उचलले असावे, असा गंभीर संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून सखोल तपासाची मागणी होत आहे.