केज : युसुफवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डिघोळअंबा (ता. अंबाजोगाई) शिवारात डोक्यात दगड घालून खून करून जाळून टाकलेल्या अवस्थेत आढळलेल्या अनोळखी पुरुषाची दुसऱ्या दिवशीही ओळख पटलेली नाही. या गंभीर गुन्ह्याच्या तपासाची चक्रे वेगवान करण्यासाठी पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी गुरुवारी (दि. २६ नोव्हेंबर) घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि तपासाबाबत स्थानिक अधिकाऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन केले.

कानडी बदनकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या तलावात २५ नोव्हेंबर रोजी ५० ते ५५ वर्षे वयोगटातील एका पुरुषाचा मृतदेह आढळून आला होता. अज्ञातांनी डोक्यात दगड मारून खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह जाळून टाकण्याचा प्रयत्न केल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले आहे. मयताची ओळख न पटल्याने मृतदेह अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयाच्या शवागृहात ठेवण्यात आला आहे. ओळख पटली नसल्याने पुढील तपासात अडचणी येत असून पोलीस यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. दरम्यान, पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, सहायक पोलीस अधीक्षक वेंकटराम आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बंटेवाड यांनी घटनास्थळाची पाहणी करून युसुफवडगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप मांजरमे यांना तपासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या सूचना दिल्या.

मयताची ओळख पटवण्यासाठी पोलिसांचे आवाहन

खून झालेल्या व्यक्तीच्या अंगावर पांढऱ्या रंगाचा फाटलेला व अर्धवट जळालेला सदरा असून काळे व पिवळे पट्टे आणि लाल कापडाचे ठिगळ असलेली करड्या रंगाची चड्डी आहे. कमरेला लाल रंगाचा करदोडा असून त्याला काळ्या, पांढऱ्या व पोपटी रंगाच्या तीन चाव्या बांधलेल्या आहेत. घटनास्थळी मृतदेहाशेजारी काळ्या रंगाच्या चामड्याच्या जोड्याची जोडी तसेच लाल चौकडीचा रुमाल आणि त्यात डेटॉल व मेडिमिक्स साबण आढळून आला आहे. या वर्णनाच्या व्यक्तीबाबत कोणालाही काही माहिती असल्यास तात्काळ युसुफवडगाव पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक संदीप मांजरमे यांनी केले आहे.