अंबाजोगाई (प्रतिनिधी): तालुक्यातील प्रशासकीय कामकाजातील अनियमितता, शासकीय कर्मचाऱ्यांची गैरहजेरी आणि सर्वसामान्यांची होणारी आर्थिक पिळवणूक थांबवण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने अंबाजोगाई तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष व स्वातंत्र्यसैनिक प्रदीप पाटील खंडापूरकर यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार यांना विविध दहा महत्त्वाच्या मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. शासनाच्या विविध योजनांचा लाभ तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचावा आणि दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी, यासाठी हे आंदोलन छेडण्यात आले.
गैरहजर कर्मचारी आणि खोट्या घरभाड्यावर कारवाईची मागणी
मुख्यालयी (सज्जात) न राहणाऱ्या तलाठी, ग्रामसेवक, डॉक्टर, नर्स आणि कृषी पर्यवेक्षकांवर कडक कारवाई करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. मुख्यालयी राहत असल्याचे खोटे दाखवून घरभाडे भत्ता लाटणाऱ्या या कर्मचाऱ्यांवर फसवणुकीचे (कलम ४२० अंतर्गत) गुन्हे दाखल करावेत, तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अरेरावी करणाऱ्या निरीक्षकांवर कारवाई करावी, अशी आग्रही भूमिका समितीने मांडली आहे. याशिवाय आरटीओ निरीक्षकांकडून वाहनधारकांना होणारा त्रास आणि अवाजवी ऑनलाइन दंड तात्काळ थांबवण्याची मागणीही करण्यात आली आहे.
शेतकरी, महिला आणि दुर्बल घटकांना दिलासा देण्याची गरज
दुष्काळी परिस्थितीमुळे शासनाने कर्जवसुलीला ८ महिन्यांची स्थगिती दिली असतानाही बँका व फायनान्स कंपन्यांकडून व्याज आकारले जात आहे. नवीन पीक येईपर्यंत हे व्याज माफ करावे, बंद पडलेले रेशनकार्ड पूर्ववत करावेत आणि नरेगा योजनेतून महिलांना काम देऊन १५ दिवसांत मजुरी अदा करावी, असे निवेदनात म्हटले आहे. तसेच दिव्यांगांच्या मानधनात वाढ करावी, वृद्ध, एकल महिला व बालसंगोपन योजनेच्या मानधनासाठी कोणतेही शुल्क आकारू नये आणि महिला सन्मान योजनेतील तांत्रिक अडचणींमुळे होणारी जादा तिकीट आकारणी बंद करावी, अशी मागणी प्रदीप पाटील खंडापूरकर यांनी केली आहे.












प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!